
‘हिमालयाची सावली’ नाटक करताना बाया कर्वेंच्या पुस्तकाने माझे आयुष्य बदलून टाकले… सांगतेय अभिनेत्री शृजा प्रभुदेसाई.
आयुष्यात अनेक घटना आणि प्रसंग घडतात, पण त्याचबरोबर काही माणसेही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपल्या आयुष्यात डोकावतात, जी हृदयाला भिडतात किंवा मनात घर करून राहतात. आमचे ‘हिमालयाची सावली’ हे नाटक रंगभूमीवर येऊ घातले होते. नाटककार वसंत कानेटकर यांनी लिहिलेली इतकी अफाट कलाकृती त्या निमित्ताने माझ्या आयुष्यात आली. वसंत कानेटकर यांची लेखणी, नरहर कुरुंदकर यांनी लिहिलेली या नाटकाची प्रस्तावना आणि एखादी मोठी घटना नाटकात नसूनही दोन विरुद्ध स्वभाव व विचारसरणीने आयुष्य जगणाऱया व्यक्तिरेखा, हे सर्व त्यांनी एका सूत्रात गुंफलेले पाहून मी अचंबित झाले. कानेटकरांच्या लेखनाच्या मी आपंठ प्रेमात आहेच आणि त्यांच्या लेखणीने मी आधीच प्रभावित होते, पण या नाटकाच्या दरम्यान मला नव्याने काही गवसत गेले.
मुळात धोंडो केशव कर्वे आणि त्यांची पत्नी आनंदीबाई म्हणजे बाया कर्वे यांच्या खऱया जीवनावर आधारित ‘हिमालयाची सावली’ हे नाटक आहे. या नाटकात मी ‘बयो’ ही भूमिका रंगवत होते. माझ्या या ‘बयो’ व्यक्तिरेखेचा अभ्यास करताना, माझ्या वाचनात बाया कर्वे यांनी स्वतः लिहिलेले पुस्तक आले, ते मी वाचून काढले. धोंडो केशव कर्वे यांच्याबद्दल तर मनात आधीपासून अफाट आदर, कुतूहल, प्रेम, जिव्हाळा अशा बऱयाच गोष्टी होत्याच, पण जेव्हा मी बाया कर्वे यांचे पुस्तक वाचले, तेव्हा मी पार झपाटून गेले. बाया कर्वे यांनी त्या पुस्तकात त्यांचे आयुष्य ज्या पद्धतीने मांडले आहे, ते पाहिल्यावर मी निःशब्दच झाले. किती प्रामाणिक व अफाट आयुष्य त्या जगल्या आणि तेसुद्धा प्रसिद्धीमध्ये न येता.
धोंडो केशव कर्वे यांचे तर कर्तृत्वच इतके महान आहे की, इतक्या वर्षांनंतरसुद्धा त्यांचे नाव आदराने घेतले जाते आणि अजून पुढची कित्येक वर्षे त्यांचा गौरव होत राहील. त्यांचे कार्य थोरच आहे, परंतु त्यांची पत्नी बाया कर्वे यांनी प्रसिद्धीमध्ये न येता जगलेले त्यांचे आयुष्य मला थक्क करून गेले. बाया कर्वे या किती परिपूर्ण, खोल आणि अर्थपूर्ण आयुष्य जगल्या, विचारांनी त्या किती परिपक्व होत्या, किती मेहनत त्यांनी आयुष्यात घेतली, किती त्याग केला, किती स्वतःला वाहून घेतले, हे सगळे प्रचंड प्रभाव टाकणारे आहे. हे वाचल्यावर मला एकदम थक्क व्हायला झाले.
बाया कर्वे यांनी धोंडो केशव कर्वे यांचा संसार तर केलाच, पण समाजासाठी त्यांना जे काही करणे शक्य होते ते त्यांनी निःस्वार्थीपणे शेवटपर्यंत केले. त्यांचे पुस्तक वाचल्यानंतर हे सर्व कळते. त्यामुळे माझा त्यांच्याबद्दलचा आदर आणि त्यांच्याविषयी वाटणारे प्रेम खूप वाढले. त्यांचे पुस्तक वाचून मी प्रचंड प्रभावित झाले. या वाचनातून बऱयाच गोष्टींचा अर्थ कळला आणि आयुष्याकडे कसे बघायला हवे, याची नवी दृष्टी मिळाली. त्यांच्या या पुस्तकाचे नाव आहे ‘माझे पुराण.’ बाया कर्वे यांच्या आयुष्यावर प्रभाव असलेल्या रमाबाई रानडे, धोंडो केशव कर्वे यांचीही व्यक्तिमत्त्वे या पुस्तकातून उमजत जातात. बाया कर्वे यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व या पुस्तकामुळे मला वाचायला मिळाले, हे मी माझे भाग्य समजते.
शब्दांकन : राज चिंचणकर



























































