प्रभासला मी त्रास दिला होता, अभिनेत्रीने दिली कबुली

‘वॉल्टेअर वीरय्या’ आणि ‘वीरा सिम्हा रेड्डी’ या बॅक टू बॅक सिनेमांमुळे दाक्षिणात्य अभिनेत्री चर्चेत आली आहे. आता ती ‘सालार -पार्ट1 सीझफायर’ या तिसऱ्या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तयारीत आहे. नुकत्याच एका मुलाखतीत अभिनेत्रीने प्रभाससोबतच्या मैत्रीबाबत खुलासा केला. यावेळी तिने प्रभासची वर्तणूक, सकारात्मकपणा याबाबत कौतुक केले आहे. त्याचबरोबर तिने प्रभासला सेटवर खूप त्रास दिल्याची कबुलीही दिली आहे.

इंडिया टूडेला दिलेल्या मुलाखतीत, दाक्षिणात्य अभिनेत्री आणि कमल हासन यांची मुलगी श्रुती हासन ‘सालार’ या सिनेमात आद्या नावाची भूमिका साकारतेय. सिनेमातील तिची ही भूमिका आव्हानात्मक आहे. ती यामध्ये एका शांत आणि संयमी मुलीचे पात्र साकारतेय आणि अनपेक्षितपणे एका अडचणीत सापडते.

सालार सिनेमाच्या निमित्ताने प्रभास आणि श्रुतीमध्ये चांगली मैत्री झाली. प्रभाससोबतच्या मैत्रीबद्दल बोलताना तिने सांगितले की, आज प्रभासला मित्र बोलताना खूप आनंद होतो. तो फार वेगळा आहे. अतिशय अद्भुत, दयाळू, वैचारीक, उदार आणि चांगल्या मनाचा आहे. प्रभासबाबत बोलताना श्रुती म्हणते, प्रभास सेटवर हलकंफुलकं वातावरण करतो. सेटवरील प्रत्येकाला तो आपलेसे करतो. अनेकदा मी त्याला डिवचायचे, काहीही बोलायचे, त्याला त्रास द्यायचे मात्र तो ते सगळं सहन करायचा. कधीतरी सामान्य ज्ञान आणि संगीतावर बोलायचो त्यावेळीही तो संयम ठेवून ऐकायचा. कधीतरी माझ्या बोलण्यावर हसतो आणि कधीतरी मी बोललेले त्याच्या डोक्यावरुनही जायचे.

श्रुती हासन सध्या प्रशांत नीलच्या सालार या चित्रपटाच्या शूटिंगसाठी हैदराबादमध्ये आहे. सालारमध्ये प्रभास एका नवीन अवतारात आहे तर श्रुती हासन या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारत आहे. होम्बल फिल्म्स निर्मित, ‘सालार: पार्ट 1 सीझफायर’ हा चित्रपट प्रशांत नील यांनी दिग्दर्शित केला आहे आणि यात प्रभास, श्रुती हासन, पृथ्वीराज सुकुमारन आणि जगपती बाबू हे मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत. हा सिनेमा 22 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे