
सामना प्रतिनिधी । चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्यातील सिकलसेलग्रस्त रुग्णांना सरकारी योजनांच्या अंमलबजाणीअभावी नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. राज्य शासनाच्या कोणत्याच योजनांचा लाभ मिळत नसल्यानं त्यांना जगणं कठीण झालं आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात 2 हजार 650 सिकलसेल आजाराचे रुग्ण आहेत. या रुग्णांना नेहमीच औषधांची गरज असते. जिल्हा रुग्णालयात सिकलसेल रुग्णांना मोफत औषधोपचार व रक्त मिळेल, असे फलक लावण्यात आलेले आहेत. स्वतंत्र बेडची व्यवस्थासुद्धा आहे. मात्र, जिल्हा रुग्णालयात या कोणत्याच सुविधांचा लाभ या रुग्णांना मिळत नाही. जिल्हा रुग्णालयात समुपदेशक नियुक्त करण्यात आले आहेत. हे समुपदेक केवळ वेतन घेण्यापुरतेच मर्यादित असून, सिकलसेलग्रस्तांना यांची कोणतीही मदत होत नाही. रुग्ण उपचारासाठी आल्यानंतर त्यांना कोणतेही मागर्दशन समुपदेशकांकडून होत नाही. सिकलसेल रुग्णांची औषधं महागडी असल्याने शासकीय रुग्णालयातून ती निशुल्क उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मात्र, चंद्रपूर जिल्हा रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयात कोणतीच ओषधे नाहीत.
अपंगांची प्रमाणपत्रे देतानाही अनेक जाचक अटी लादण्यात आल्या आहेत, असे विनोद ढोके, सतीश पिंपळकर सिकलसेल रुग्णांनी सांगितले. या रुग्नांना बस प्रवास मोफत असला तरी केवळ दीडशे किमीची मर्यादा असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. उपचारासाठी दूरवरच्या शहरात जाता येत नाही. अशा अनेक समस्यांशी दोन हात करीत हे रुग्ण जीवन जगत आहेत. आता यासंदर्भात योग्य ती पावलं उचलली जातील, असं जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी सांगितले. सुविधा आणि औषधसाठा केवळ कागदावर असून रुग्णांना खासगी रुग्णालयांची सेवा घ्यावी लागत आहे. औषधोपचारासाठी खर्च करण्यासाठी पैसे नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.



























































