नूतन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी पदभार स्वीकारला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिल्हा सहकाराचा जिल्हा आहे. धार्मिक पर्यटनस्थळेसुद्धा आहेत. आगामी काळामध्ये सर्वांना बरोबर घेऊन नगर जिह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील तसेच नगर जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आणण्याच्या दृष्टीने नियोजन केले जाईल, अशी ग्वाही नगरचे नूतन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली.

नगरचे मावळते जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडून जिल्हाधिकारी सालीमठ यांनी पदभार स्वीकारला, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, नगर जिल्हा हा भौगोलिकदृष्टय़ा सर्वाधिक मोठा जिल्हा आहे. या जिह्यातील राहुरी कृषी विद्यापीठामध्ये मी शिक्षण घेतले आहे. त्यामुळे माझी ही कर्मभूमीच आहे, असे मी मानतो. नगर जिल्हा प्रत्येक बाबींमध्ये अग्रेसर व्हावा, जिह्याची ओळख राज्याला व्हावी, या दृष्टिकोनातून महसूल प्रशासनाच्या माध्यमातून ज्या-ज्या काही योजना असतील अथवा प्रकल्प असतील ते राबवले जातील. सर्वांना बरोबर घेऊन जिह्याच्या विकासामध्ये योगदान घेतले जाईल व नगर जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर राहील, यासाठी प्रयत्न केले करण्यात येतील, असेही सालीमठ यांनी सांगितले. जी-जी कामे प्रलंबित आहेत, ती सोडवण्यास प्राधान्यक्रम दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. राजेंद्र भोसले म्हणाले, अडीच वर्षे काम करताना नगरकर जनता, प्रशासनातील अधिकारी आणि राजकीय मंडळींनी उत्तम साथ दिली. त्यामुळे नगर जिह्याच्या विकासासाठी काम करता आले. कोरोनाच्या दुसऱया लाटेमध्ये नगरमध्ये माझी नियुक्ती झाली. कोरोनाकाळात जनतेला उत्तम सेवा देण्यासाठी काम केले. राजकीयदृष्टय़ा जागरूक जिल्हा म्हणून नगरची ओळख आहे, असे सांगत मला काम करताना कोणीही त्रास दिला नाही, असेही भोसले यांनी सांगितले.