आंब्यासाठी 18 कोटींची विमा, काजूला मात्र एकही रुपया नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामान बदल व नैसर्गिक आपत्ती यामुळे बाधित झालेल्या आंबा फळाच्या नुकसानी पोटी एच डी एफ सी आर्गो कंपनी या विमा कंपनीने 18 कोटींची विमा रक्कम मंजूर केली आहे. याचवेळी जिल्ह्यातील काजू नुकसानीचा एकही रुपया मंजूर केलेला नाही. दरम्यान, 2019 साठी जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदारांनी विमा उतरावा, असे आवाहन जिल्हा कृषि अधीक्षक शिवाजी शेळके यांनी केले आहे.

2018 मध्ये जिल्ह्यातील 6,644 आंबा बागायतदारांनी 6,200 हेक्टर क्षेत्रफळातील आंबा झाडांचे 3 कोटी 41 लाख रूपये भरून विमा उतरविला होता. तर 1992 काजू बागायत मालकांनी 117 हेक्टर क्षेत्रातील काजुचा 30 लाख 78 हजार रूपये भरून विमा उतरविला होता. कर्जदार बागायती असलेल्या शेतकऱ्यांना हा विमा उतरविणे बंधनकारक होते. 448 बिगर कर्जदार आंबा व 34 काजू बागायतदारांनी यात विमा उतरविला होता. जिल्ह्यात 39 महसुल मंडळे आहेत. यातील देवगड तालुक्यातील बापार्डे, देवगड, मिठबाव, पडेल, पाटगाव, शिरगाव तर मालवण तालुक्यातील मालवण अशा महसुल मंडळातील एकाही आंबा बागायत दाराला विमा रक्कम मंजूर झालेली नाही. काजूसाठी मात्र एकही रुपया मंजूर झाला नसल्याचे शेळके यांनी सांगितले.