
सामना प्रतिनिधी । पुणे
दोन हजार आणि ५०० रूपयांच्या बनावट नोटा तयार करून त्या चलनात आणण्यासाठी पुण्यात पाठवून देणार्या सुत्रधाराला तमिळनाडूतील तेरूवेल्ली येथून अटक करण्यात आली. त्याच्याकडून ४ लाख २९ हजार रूपयांच्या बनावट नोटा आणि साहित्य असा साडे चार लाखाचा ऐवज गुन्हे शाखेच्या युनीट दोनने जप्त केला आहे. या सुत्रधाराने २००१मध्ये येरवडा भागात एका पत्रकाराचा खून केला होता, तो जामीनावर बाहेर सुटल्यापासून फरार होता.
व्यंकटेश मुदलीयार असे सुत्रधाराचे नाव आहे. त्याचे साथीदार राजेश चंद्रभान, अलका क्षीरसागर, आनंद जाधव, त्याची पत्नी सुनिता जाधव यांना अटक केली आहे. श्रीहरी नायर हा पळून गेला आहे.
गेल्या आठवड्यात गुन्हे शाखेच्या युनीट दोनचे वरिष्ठ निरीक्षक गजानन पवार यांच्या पथकाने ढोले पाटील रस्त्यावरून एका महिलेसह दोघांना बनावट नोटांसह अटक केली होती. त्यांच्याकडे दोन हजाराच्या ५५ व ५०० च्या १०४ बनावट नोटा सापडल्या होत्या. या दोघांकडे चौकशी केली असता मंचर येथील जाधव यांच्याकडून आणल्याचे समोर आले. त्यानुसार जाधव दांपत्याला अटक केली. त्यांच्या घरतून २४ हजाराच्या बनावट नोटा जप्त केल्या. जाधवकडे चौकशी केली असता या नोटा तमिळनाडूतून येत असल्याचे समोर आले.
पेरियापालम आयडीयल सिटी तेरूवेल्ली येथे व्यंकटेश मुदलीयार हा नोटा तयार करतो तर नायर हा पुण्यात घेऊन येतो असे समोर आले. त्यानुसार सहाय्यक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे यांच्या तेरूवेल्लीतील चेन्ने गावात मुदलीयारच्या घरावर छापा टावूâन त्याला ताब्यात घेतले. नोटा छापण्याठीचे प्रिंटर, व इतर साहित्य २ लाख ३५ हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या.
४० टक्के कमीशन
मुदलीयार हा नोटा तयार करून पुण्यात पाठवत होता. नोटा चलणात आणणार्या महिला व पुरूषांना तो ६० टक्के कमीशन देत होता. तर ४० टक्के कमीशन मुदलीयार व नायर घेत. नोव्हेंबर पासून त्याने सुमारे १० लाखाचे बनावट चलन बाजारात आणले आहे असे चौकशीत समोर आले आहे. या नोटा मंचर, चाकण येथील आठवडी बाजारात वापरून चलनात आणल्या आहेत.



























































