
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांमधील सामूहिक रोगप्रतिकारशक्ती जाणून घेण्यासाठी करण्यात आलेल्या सेरो सर्वेक्षणाच्या दुसऱया फेरीतही झोपडपट्टी आणि दाट वस्त्यांमध्ये राहणाऱया व्यक्तींमध्येच अँटिबॉडीज तयार होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे आढळले आहे. दाट वस्त्यांमधील राहणाऱया 45 टक्के लोकांमध्ये तर इमारत, गृहसंकुलांमध्ये राहणाऱया 18 टक्के अँटिबॉडीज आढळल्या आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, सेरीची पहिली फेरी जुलै महिन्याच्या अखेरीस घेण्यात आली होती. त्यात दाट वस्त्यांमध्ये राहणार्या 57 टक्के व्यक्तींमध्ये तर इमारती, गृहसंकुलात राहणाऱ्या 16 टक्के व्यक्तींमध्ये अँटिबॉडीज आढळल्या होत्या. दुसऱया फेरीतील सर्वेक्षणामध्ये लक्षणे असलेल्या, बरे झालेल्या किंवा लक्षणे नसलेल्या व्यक्तींचा समावेश होता तसेच संस्थात्माक विलगीकरणात असलेल्या आणि सक्रीय प्रतिबंधात्मक क्षेत्रातील व्यक्तींना या अभ्यासातून वगळण्यात आले. एकूण नमुन्यांपैकी साधारणपणे एक ते दोन टक्के नमुने हे गेल्या फेरीत सहभागी झालेल्या व्यक्तींचेही होते. सेरो सर्वेक्षणाचा दुसरा टप्पा आर/उत्तर, एम/पश्चिम आणि एफ/उत्तर याच तीन विभागात सप्टेंबर अखेरीस करण्यात आला. या दुसऱया फेरीअंतर्गत 5 हजार 384 नमुने गोळा करण्यात आले. सेरोलॉजिकल सर्वेक्षण नीती आयोग, पालिका, टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (टीआयएफआर) यांच्याद्वारे राबवण्यात येत आहे.
सर्वेक्षणाच्या दोन्ही फेरीतही पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अँन्टीबॉडीजचे प्रमाण अधिक आढळले. मात्र, पहिल्या फेरी दरम्यान तीनही विभागांतील लोकसंख्येमध्ये सर्व वयोगटांमध्ये समान प्रमाण आढळले होते, तर दुसऱया फेरीदरम्यान हे अँटिबॉडीजचे प्रमाण 40 पेक्षा अधिक वयोगटातील व्यक्तींमध्ये काही प्रमाणात जास्त असल्याचे आढळले. सर्वेक्षणाच्या दोन्ही फेऱयांदरम्यान आरोग्यसेवकांमध्ये सरासरी 27 टक्के अँन्टीबॉडीज आढळले. हेल्थ पोस्ट, दवाखाने, आरोग्य कार्यालय आणि क्षेत्रस्तरावर काम करणारे कर्मचारी यांचा समावेश आहे. कोरोनामुक्त झालेले रुग्ण तसेच लक्षणे नसलेले रुग्ण यांच्यामध्ये काही कालावधीनंतर अँन्टीबॉडीज पातळी ही घसरते, ही बाब दोन्ही फेऱयामधील सर्वेक्षणादरम्यानचा कल दर्शवते. मात्र, या बाबीचा प्रतिकारशक्तीवर काही परिणाम होत असल्याची माहिती अद्याप नाही, असे सर्वेक्षणात म्हटले आहे.



























































