सोलापुरात 38 प्रभाग अन् 113 सदस्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचना जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, ‘कही खुशी, कही गम’ तर भौगोलिकदृष्टय़ा अनेक प्रभागांची रचना तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे काहींसाठी हा प्रभाग लाभकारक, तर काहीजणांना फटका बसणार आहे. प्रभागरचनेचा आराखडा जाहीर झाल्याने विद्यमान नगरसेवक आणि इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला आता खऱ्या अर्थाने वेग येणार आहे. महापालिकेची आगामी निवडणूक त्रिसदस्यीय पद्धतीने होणार आहे. पालिकेत एकूण 38 प्रभाग आणि 113 सदस्य असतील. 1 ते 37 प्रभाग तीन सदस्यीय, तर शेवटचा 38वा प्रभाग द्विसदस्यीय असेल.

आयुक्त पी. शिवशंकर यांनी मंगळवारी हा प्रारूप आराखडा महापालिकेच्या वेबसाईटवर तसेच महापालिका कौन्सिल हॉल आकारात फलकावर प्रसिद्ध केला आहे. यामध्ये ऑनलाइन नकाशा व सविस्तर प्रभागरचना नमूद आहे. दरम्यान, प्रारूप रचना पाहण्यासाठी महापालिका आकारात राजकीय पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व इच्छुकांची मोठी गर्दी झाली होती. अनेकजण आपल्या मोबाईलवर ऑनलाइन प्रभाग रचना वाचून चर्चा करत असल्याचे दिसून आले. अनेक प्रभाग नव्याने निर्माण केले आहेत.