चिप्पा मार्केटमधील खुनाचा अवघ्या 12 तासांत छडा, टेलरच्या पावतीवरून आरोपीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महापालिकेच्या चिप्पा मार्केटमध्ये डोक्यात फरशी घालून तरुणाचा खून करणाऱया आरोपीला पोलिसांनी अवघ्या 12 तासांत गजाआड केले आहे. मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली होती. सीसीटीव्ही फुटेज व कपडे शिलाईच्या पावतीवरून पोलीस आरोपीपर्यंत पोहोचल्याची माहिती पुढे आली आहे. बबलू गुलाब हुंडेकरी (वय 35, रा. पद्मानगर, अक्कलकोट रोड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून, याप्रकरणी त्याचा मित्र बसवराज रवींद्र अतनुरे (वय 25, रा. पद्मानगर, अक्कलकोट रोड) याला अटक केली आहे.

बबलू व बसवराज हे दोघेही बालपणापासून मित्र होते. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास महापालिकेच्या चिप्पा मार्केटमध्ये दोघे आले होते. याच ठिकाणी अतनुरे याने डोक्यात फरशी घालून निर्घृण खून केला. चेहरा छिन्नविच्छिन्न झाल्याने ओळख पटली नव्हती. घटनास्थळी दारूची बाटली, ग्लास व कपडा शिलाईची पावती पोलिसांना आढळली. आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेज व पावतीवरून मृताची ओळख पटली व आरोपीपर्यंत पोलीस पोहोचू शकले. बसवराज अतनुरे याला पोलिसांनी अटक केली असून, त्याने गुह्याची कबुली दिली आहे. खुनाचे कारण अद्यापि उलगडले नसून, जेलरोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चिताकिंदी तपास करीत आहेत.