
महापालिकेच्या वतीने बेगम पेठ, पाच्छा पेठ आणि साखर पेठ येथे व्यापारी संकुले बांधण्यात येत आहेत. या संकुलांमधील व्यापारी गाळ्यांसाठी ऑफलाइन लिलाव पुकारण्यात येणार आहे. यापूर्वी दोन वेळा लिलाव पुकारण्यात आला, पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे नियमात सुधारणा केल्या आहेत. आता अनामत रक्कम 29 वर्षांनी परत देण्यात येणार आहे. यापूर्वी ती परत मिळणार नव्हती. ती अट रद्द करण्यात आल्याचे पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले.
पाच्छा पेठेत तळमजला ते सहा मजल्यापर्यंत गाळे आहेत. तेथे हॉल आहेत. 14 ते 100 चौरस मीटरपर्यंतच्या जागा असून, 36 गाळे आहेत. साखर पेठेत तीन मजले असून, तेथे गाळे, लॉज, कार्यालये, संस्था यासाठी जागा असणार आहे. 42 शॉप्स आहेत. पाच्छा पेठेत कार्यक्रम हॉल, ऑफिस, गाळे यासाठी तीन मजले आहेत. यासाठी महापालिकेने यापूर्वी भाडे आणि विनापरतावा अनामत रक्कम ठरवली होती; पण प्रतिसाद मिळत नसल्याने अनामत रक्कम परत देण्यात येणार आहे. व्यापारी, वित्तीय संस्था, निमशासकीय कार्यालये, कंपन्यांच्या प्रतिनिधींनी नगर अभियंता संदीप कारंजे यांना संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
सोलापूर महानगरपालिकेच्या व्यापारी गाळ्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना बँकेचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी बँक अधिकाऱ्यांशी पालिका आयुक्त पी. शिवशंकर हे चर्चा करत आहेत. अनामत रक्कम देण्यासाठी चार टप्पे करण्यात आले असून, बांधकामाच्या प्रगतीनुसार रक्कम घेण्यात येणार आहे. व्यापारी गाळ्यांतील जागा घेण्यासाठी व्यापारी संस्था, निमशासकीय संस्था, कंपन्या, वित्तीय संस्था यांनी पुढे यावे, असे आवाहन महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.



























































