कुलगाम, पुलवामामध्ये चकमकीत 3 दहशतवादी ठार; एक जवान शहीद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दररोज लष्करी, निमलष्करी दलांची पथके आणि दहशतवादी यांच्यामध्ये चकमकीच्या घटना घडत आहेत. आज (मंगळवार) पहाटे येथील कुलगाम आणि पुलवामा जिल्ह्यात चकमक झाली. या चकमकीत एकूण 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले, तर एक जवान शहीद झाला.

कुलगामच्या रेडवानी भागात तर पुलवामाच्या त्रालमधील हाफू भागात गस्तीदरम्यान सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी समोरासमोर आले. त्यानंतर दोन्ही बाजूंकडून जोरदार गोळीबार झाला. यामध्ये जीवितहानीबाबतची कोणतीही माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही.

सोमवारी सुरक्षादलांनी केला होता दहशतवादी तळ उद्ध्वस्त
सुरक्षा रक्षकांनी सोमवारी गांदरबल जिल्ह्यात शोध मोहिमेदरम्यान एक दहशतवाद तळ उद्ध्वस्त करीत मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे आणि स्फोटके जप्त केली होती. या भागात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानुसार, ही कारवाई करण्यात आली होती.गांदरबल पोलीस आणि लष्कराच्या 5 राष्ट्रीय रायफल्सने एका सूचनेनुसार जिल्ह्याच्या गुटलीबाग भागात बदरगुंड येथे संयुक्त शोध मोहिम राबवली होती. यावेळी जंगल भागात दहशतवाद्यांच्या एका तळाला उद्ध्वस्त करुन एक इन्सास रायफल, चार मॅगेझिन्स, आठ काडतुसं, एके-47 रायफलचे 37 राऊंड आणि 1 चिनी हातबॉम्ब जप्त करण्यात आला होता. त्याचबरोबर येथून काही खाण्याच्या वस्तूही सुरक्षा रक्षकांना आढळून आल्या होत्या.