
सामना ऑनलाईन । रायपूर
अंधश्रद्धेपायी एका मुलाने स्वतःच्या जन्मदात्या आईचा नरबळी दिल्याची भयंकर घटना छत्तीसगड येथील कोरबा येथे घडली आहे. हत्येनंतर मुलाने तिचं रक्त प्राशन केलं आणि तंत्रसाधना करण्यासाठी तिच्या मृतदेहाचे तुकडेही केले.
जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, कोरबा येथील रामाकछार नावाच्या गावात दिलीप लाल (25) आपली आई सुमारिया (50)सोबत राहत होता. त्याचे वडील आणि लहान भाऊ यांचा काही वर्षांपूर्वीच मृत्यू झाला होता. वडील आणि भावाच्या मृत्युनंतर दिलीप काळी जादू आणि तंत्रसाधनेच्या नादाला लागला होता. स्वतःच्या घरात हे अघोरी प्रकार करण्यासाठी त्याने एक जागाही बनवली होती. 31 डिसेंबर 2018 रोजी सकाळी साडे दहाच्या सुमाराला त्याने सुमारियाची धारदार शस्त्राने हत्या केली. हत्येनंतर तिच्या मृतदेहातून वाहणारं रक्तही त्याने प्यायलं.
त्याच दरम्यान त्याची शेजारीण त्याच्या घरी आली तेव्हा तिने हा भयंकर प्रकार पाहिला. मात्र, जिवाच्या भीतीने ती काहीही न बोलता तिथून घरी परत गेली.या प्रकारामुळे तीन दिवस अस्वस्थ असलेल्या शेजारणीने शेवटी कुटुंबीयांना हा प्रकार सांगितला. त्यांनी त्वरित पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी दिलीपच्या घरावर धाड टाकली आणि घराचं दार उघडलं. दरवाजा उघडताच समोर दिसलेल्या गोष्टींमुळे ते स्तंभित झाले. आत चुलीच्या राखेत सुमारियाच्या अस्थी होत्या. घराच्या भिंतीवर रक्ताचा शिडकावा झाला होता आणि त्याच्या अघोरी साधनेच्या ठिकाणी मांसाचे तुकडेही सापडले. हत्येत वापरलेलं शस्त्रंही तिथेच होतं. मात्र, दिलीप कुठेही आढळला नाही. पोलिसांनी मृतदेहाचे तुकडे ताब्यात घेऊन दिलीपविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे. सध्या दिलीप फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
























































