मुंबईत धक्कादायक घटना, झोपमोड केल्याच्या रागातून मुलाने आईला संपवले!

झोपमोड केल्याच्या रागातून 64 वर्षीय मुलाने 78 वर्षांच्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली. ग्रँट रोड परिसरात मंगळवारी पहाटे ही घटना घडली. याप्रकरणी डीबी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सुभाष पुंजाजी वाघ असे आरोपीचे नाव आहे. तर रमाबाई नथू पिसाळ असे मयत वृद्धेचे नाव आहे.

पिसाळ या वयोवृद्ध असल्याने त्यांना रात्री झोपेची समस्या होती. झोप येत नसल्याने त्या रात्री घरची कामे करत असायच्या. मात्र घरी काम करताना होणाऱ्या आवाजामुळे आरोपीची झोपमोड होत असे. यावरून नेहमी मायलेकात भांडण होत असे. आरोपीची पत्नी त्याला सोडून गेली आहे. त्यामुळे तो आईसोबत राहत होता. पिसाळ यांचा भाजीचा स्टॉल भाड्याने दिला होता. त्यावर मायलेकांचा उदरनिर्वाह चालत असे.

नेहमीप्रमाणे मंगळवारी पहाटे झोपमोड झाल्याच्या कारणातून आरोपी आणि वृद्ध महिलेमध्ये भांडण झाले. यानंतर संतापलेल्या आरोपीने भाजी चिरण्याच्या चाकूने महिलेवर वार केले. यात गंभीर जखमी पिसाळ यांचा जागीच मृत्यू झाला.

हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतः शेजारच्या खोलीत राहणाऱ्या पुतण्याला घटनेबाबत सांगितले. त्यानंतर पुतण्याने डीबी पोलिसांना हत्येची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत आरोपीला ताब्यात घेतले. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.