बुवा-भतीजा साथसाथ, सपा आणि बसपा 38-38 जागा लढवणार

34

सामना ऑनलाईन । लखनौ

तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीत केंद्रातील सत्तेतून भाजपला हद्दपार करण्यासाठी उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी या दोन प्रमुख पक्षांनी तब्बल 26 वर्षांनी आज ‘आघाडी’ केली. त्याची घोषणा सपा नेते अखिलेश यादव आणि बसपा नेत्या मायावती यांनी aएका पत्रकार परिषदेत केली. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागा आहेत. त्यातील सपा आणि बसपा 38-38 अशा समसमान जागा लढवणार आहे.

सोनिया गांधी आणि राहुल गांधी या दोघांनाही उत्तर प्रदेशातील आपापल्या लोकसभा मतदारसंघात अडकून पडावे लागू नये, यासाठी अमेठी, रायबरेली या त्यांच्या दोन्ही जागा आम्ही काँग्रेससाठी सोडल्यात, असे मायावती यांनी सांगितले. उरलेल्या आणखी दोन जागा छोटय़ा मित्र पक्षांसाठी शिल्लक ठेवल्या आहेत, असे त्या दोघा नेत्यांनी सांगितले. सपा-बसपाच्या ‘आघाडी’मध्ये काँग्रेसला घेण्याचे का टाळले, याचे स्पष्टीकरण मायावती यांनी दिले. सपा-बसपा यांची मते एकमेकांकडे पुरेपूर वळतात. पण काँग्रेससोबत ‘आघाडी’ केली तर बसपाची मते काँग्रेसकडे पूर्णपणे जातात. आमच्यासाठी सोडलेल्या जागांवर काँग्रेसची मते बसपाऐवजी भलतीकडे वळतात. त्यात आमचे नुकसान होते, याचा कटू अनुभव 1996 च्या विधानसभा निवडणुकीत बसपला आलेला आहे, असे मायावती यांनी सांगितले.

सपा-बसपा यांच्या एकजुटीने 1993 सालात उत्तर प्रदेशात भाजपचा सफाया केलेला आहेच. आता आमचे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र आल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा या ‘गुरू चेले’ असलेल्या दोघांचीही झोप उडणार आहे. – मायावती, अध्यक्षा बसपा

मायावती-अखिलेश यांनी सपा-बसपा आघाडी केली. त्यांच्या निर्णयाचा आपण आदर करतो. तो त्यांचा निर्णय आहे. पण उत्तर प्रदेशात आम्हाला काँग्रेसला उभे करायचे आहे. ते कसे करायचे, आम्ही पाहू. आमची लढाई भाजपच्या विचारधारेशी आहे. उत्तर प्रदेशात ती लढाई काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी लढेल.
– राहुल गांधी, अध्यक्ष काँग्रेस

आपली प्रतिक्रिया द्या