
>> प्रसाद ताम्हनकर
अंतराळ मोहिमांद्वारे मिळणाऱया माहितीची देवाणघेवाण करण्याची मैत्रीपूर्ण भाषा अगदी प्रत्येक देश जाहीरपणे करत असला तरी अंतराळ क्षेत्रात फक्त आपल्याचा देशाचा झेंडा कसा वरचढ राहील यासाठीच प्रत्येक देश झटत आहे हेदेखील तेवढेच खरे. यासाठी कालचे शत्रू आज मित्र होऊन गळ्यात गळे घालतानादेखील दिसत आहेत. काही काळापूर्वीपर्यंत अंतराळ संशोधन क्षेत्रात अमेरिकेचा खास मित्र म्हणून ओळखल्या जात असलेल्या रशियाने आता चक्क चीनशी हातमिळवणी करत चीनच्या मदतीनेच चंद्रावर एक रिसर्च सेंटर अर्थात प्रयोगशाळा उभारण्याची घोषणा केली आहे.
जगातील प्रमुख देशांत सध्या अंतराळ क्षेत्रातील वर्चस्वावरून चढाओढ चालू आहे. हिंदुस्थानच्या चांद्रयान मोहिमेनंतरच खरे तर या वर्चस्वाच्या लढाईला खरे तोंड फुटले असे म्हणायला हरकत नाही. चंद्र किंवा चंद्राच्या कक्षेत स्थापन केली जाणारी ही मानवरहित प्रयोगशाळा चंद्रावरच्या विविध शोधांमध्ये भविष्यात महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. गमतीचा भाग म्हणजे अमेरिकेच्या अंतराळ संशोधनातला प्रमुख सहायक असे बिरूद मिरवणारा रशिया हा एकेकाळी अमेरिकेचा अंतराळ संशोधनातला प्रमुख प्रतिस्पर्धी होता. अंतराळ वर्चस्वाची लढाई ही खरे तर या दोन देशांच्या मुळेच सुरू झाली होती असे म्हणायला हरकत नाही. एकेकाळी या दोन्ही देशांनी चांद्रमोहिमांसाठी आपले वर्चस्व पणाला लावलेले होते.
रशियाची ‘लुना’ आणि अमेरिकेची ‘अपोलो’ मोहीम ही तेव्हा सर्वत्र चर्चेचा विषय बनलेली होती. अमेरिकेचा हात सोडून आता चीनचा हात धरण्याच्या रशियाच्या धोरणामागे अनेक कारणे असल्याची चर्चा या अंतराळ क्षेत्रातील तज्ञांमध्ये आहे. सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे या दशकाच्या शेवटी ‘आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन प्रोग्राम’ समाप्त होत आहे. यानंतरच्या काळात अमेरिका व इतर देशांपासून लांब राहत चीनच्या मदतीने स्वतःच्या नव्या मोहिमा आखण्याचे धोरण रशिया राबवू पाहत आहे. मुख्य म्हणजे ‘आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन प्रोग्राम’च्या समाप्तीनंतर ‘ ‘Artemis Accords’ या अंतराळ करारावर सर्व जगाचे लक्ष असणार आहे.
जगातील प्रमुख देशांनी संयुक्तपणे चंद्रावर शोध मोहीम राबविण्यासाठी हा करार केलेला आहे. मात्र हा करार पूर्णपणे अमेरिकापेंद्रित असल्याचा रशियाचा आरोप आहे आणि हा करार मान्य करण्यास त्यांनी नकार दिलेला आहे. त्यातच इतकी वर्षे रशियाच्या ‘सोयुज स्पेसक्राफ्ट’च्या मदतीने आपल्या अंतरिक्ष मोहिमा आखणाऱया अमेरिकेने नुकतीच आपल्या नव्या मोहिमेसाठी ‘स्पेस एक्स’ची मदत घेतल्यानेदेखील रशिया नाराज होताच. या सगळ्या घडामोडींमागे अमेरिकेच्या नव्या मोहिमेचादेखील हात असल्याची चर्चा आहे. अमेरिकेने आपल्या नव्या ‘Artemis’ मोहिमेद्वारे 2024 साली पुन्हा एकदा मानवाला चंद्रावर उतरविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ही मोहीम चीन आणि अमेरिकेतील अंतराळ लढाईला एका वेगळ्याच वळणावर नेणारी ठरत आहे. अमेरिकेच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठीच जुने वाद विसरत चीनदेखील रशियाच्या मदतीला तयार झाला आहे.
अमेरिका आणि चीन या दोन बलाढय़ अर्थव्यवस्था सध्या अंतराळ क्षेत्रातील प्रमुख दावेदार मानल्या जात आहेत. या दोन देशांमधली स्पर्धादेखील सध्या चुरशीच्या टप्प्यात आहे. ‘मंगळ ग्रह’ हे उद्दिष्ट बाळगत दोघांनी आखलेल्या मोहिमा सध्या महत्त्वाच्या टप्प्यावर पोचलेल्या आहेत. चीनचे ‘तियानवेन-1’ हे प्रोब मंगळ ग्रहाच्या कक्षेत चकरा मारत आहे. या प्रोबचे ‘रोव्हर’ मे किंवा जून महिन्यात मंगळाच्या पृष्ठभागावर उतरविण्याचे चीनचे प्रयत्न आहेत, तर दुसरीकडे अमेरिकेचे ‘Perseverance’ मंगळाच्या ‘Jezero Crater’ या भागात उतरले असून त्याने तिथे प्राचीन जीवाष्मांचा शोधदेखील सुरू केला आहे. या निर्णायक टप्प्यावर अमेरिकेचा हात सोडत चीनकडे वळलेला रशिया या अंतराळ वर्चस्वाच्या लढाईत महत्त्वाचा एक्का ठरणार आहे यात शंकाच नाही.





























































