
काँग्रेस आमदार आणि माजी मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांची चिंता वाढली आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणात न्यायालयाने सुनील केदार यांच्यासह 6 जणांना दोषी ठरवले असून तिघांची सुटका करण्यात आली आहे.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश ज्योती पेखले-पूरकर (Jyoti Peckhale-Purkar) यांच्या समोर आज सुनावणी पार पडली. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी केदार यांच्यासह सहा जणांना दोषी ठरवले असून लवकरच शिक्षा सुनावली जाणार आहे.
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 150 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा 2002 साली उघडकीस आला होता. त्यावेळी सुनील केदार हे बँकेचे अध्यक्ष होते. या खटल्यातील ते मुख्य आरोपीही असून त्यांच्यासह माजी महाव्यवस्थापक अशोक चौधरी (नागपूर), रोखे दलाल संजय अग्रवाल, केतन सेठ, सुबोध भंडारी, कानन मेवावाला, नंदकिशोर त्रिवेदी (सर्व मुंबई), अमित वर्मा (अहमदाबाद), महेंद्र अग्रवाल, श्रीप्रकाश पोद्दार (कोलकाता) व बँक कर्मचारी सुरेश पेशकर (नागपूर) यांचा यात समावेश होता.
सर्व आरोपींविरोधात भादंविच्या कलम 406 (विश्वासघात), 409 (सरकारी नोकर आदींद्वारे विश्वासघात), 468 (बनावट दस्तावेज तयार करणे), 471 (बनावट दस्तावेज खरे भासवणे) व 120-ब (कट रचणे) अंतर्गत चार्जशीट दाखल करण्यात आले होते.
पैकी सुनील केदार, अशोक चौधरी, केतन सेठ, सुबोध भंडारी, नंदकिशोर त्रिवेदी आणि अमोल वर्मा यांनी दोषी ठरवण्यात आले आहे, तर श्रीप्रकाश पोद्दार, सुरेश पेशकर, महेंद्र अग्रवाल यांची सुटका करण्यात आली आहे.





























































