वर्षानुवर्षे फरार असलेले 68 गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात, नगर जिल्हा पोलीस दलाची विशेष मोहीम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मागील 20 वर्षांपासून न्यायालयाने फरार घोषित केलेल्या गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी एक महिन्याच्या कालावधीत विशेष मोहीम हाती घेऊन 68 आरोपींना जेरबंद केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, नगर जिल्ह्यात अनेक वर्षांपासून फरार असलेल्या सुमारे चार हजार 200 आरोपींचा शोधही सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अधीक्षक पाटील म्हणाले, नगर जिह्यामध्ये न्यायालयाने 45 फरार आरोपींचे जाहीरनामे प्रसिद्ध केले होते. तर, न्यायालयामध्ये हजर न राहिल्यामुळे 168 आरोपींविरुद्ध ‘स्टॅण्डिंग वॉरंट’ काढण्यात आले होते. या आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागामार्फत एक विशेष मोहीम राबविण्यात आली. यात 68 आरोपींना अटक करण्यात आली आहे. काही फरार आरोपी मृत झालेले असल्याने तशी नोंद न्यायालयात देण्यात आली आहे.

याआधीही जिह्यामध्ये अशा प्रकारची मोहीम राबविलेली होती. जिह्यामध्ये एकूण 4200 आरोपी गेल्या 30-40 वर्षांपासून फरार आहेत. त्यांना अटक करण्यासाठीही विशेष मोहीम राबविणार असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

गेल्या महिनाभरात राबविलेल्या मोहिमेत अटक करण्यात आलेल्या 68जणांपैकी सुरेश दुधवडे हा 15 वर्षांपासून फरार होता. तो स्वतःची ओळख लपवून नावामध्ये बदल करून राहत होता. त्याला पुणे जिह्यातील जुन्नर येथून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी राबविलेल्या या मोहिमेत ‘स्टॅण्डिंग वॉरंट’मधील एकूण 51 आरोपींना अटक केलेली आहे, तर फरार असलेल्या 15 आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत सहभागी झालेल्या अधिकारी व कर्मचाऱयांचा गौरव करण्यात आला असून, त्यांना सुमारे तीन ते चार हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे. आतापर्यंत सुमारे एक लाख रुपयांची बक्षिसे देण्यात आल्याचेही अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

विद्युत अहवालाअभावी तपास रखडला

 नगर जिल्हा रुग्णालयाच्या आगीच्या प्रकरणात पोलिसांच्या हाती असलेल्या पुराव्यांच्या आधारे सुरुवातीला कारवाई करण्यात आली होती. दुसरीकडे या आगीसंदर्भात अनेक तांत्रिक बाबी आहेत. त्याचा अहवाल अद्यापि आलेला नाही. दोन वेळा पत्रव्यवहार करूनही विद्युत विभागाचा अहवाल पोलिसांना मिळालेला नाही. अहवाल प्राप्त झाल्यावर पुढची कारवाई करता येईल. त्यानंतर गुह्याचा तपास पूर्णत्वाकडे जाऊन न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील म्हणाले.

नऊपैकी तीन पोलीस ठाण्यांनाच मंजुरी

 नगर जिह्यामध्ये आत्तापर्यंत टाकळी ढोकेश्वर, मिरजगाव व खर्डा अशा तीन पोलीस ठाण्यांना शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे. उर्वरित सहा पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, त्यासंदर्भात अद्यापि कोणताही निर्णय झालेला नाही. नगर शहरातील केडगाव पोलीस ठाण्याचा प्रस्ताव तयार असून, सावेडीचा प्रस्ताव करण्याचे काम सुरू आहे. तर, शेवगाव तालुक्यातील बोधेगाव,

नेवासा तालुक्यांतील कुकाना, राहुरी तालुक्यातील

देवळाली प्रवरा व पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार या पोलीस ठाण्यांचे प्रस्ताव करण्याचे काम सुरू आहे. यासंदर्भातील प्रस्ताव मंजुरीसाठी गृह विभागाकडे पाठविला जाणार असल्याचेही अधीक्षक पाटील यांनी सांगितले.