श्रीलंकेचा UAE वर 79 धावांनी विजय, सुपर-12 गाठण्याच्या आशा कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात नामिबियाकडून लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर श्रीलंकेच्या संघाने दुसऱ्या सामन्यात जबरदस्त पुनरागमन केले. आशिया कप चॅम्पियन श्रीलंकेने मंगळवारी आयसीसी पुरुष T20 विश्वचषक 2022 गट अ मधील दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) पराभव केला. हा सामना 79 धावांनी जिंकून श्रीलंकेने सुपर-12 गाठण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. हिंदुस्थानी वंशाच्या कार्तिक माय्यानच्या शानदार हॅट्ट्रिकमुळे UAE ने श्रीलंकेला 8 बाद 152 धावांवर रोखले, परंतु श्रीलंकेने UAE ला 17.1 षटकात 73 धावांत गुंडाळले.

153 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यूएई संघाचे फलंदाज एकापाठोपाठ एक बाद होत पॅव्हेलियनमध्ये परतले. यूएई संघाकडून अफजल अयान खानने सर्वाधिक 19 धावा केल्या. त्याच्याशिवाय चिराग सैनीने 14 तर जुनैदने 18 धावांचे योगदान दिले. उर्वरित फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही.

श्रीलंकेकडून दुष्मंता चमिरा आणि वानिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. तर टीक्‍शनाला दोन आणि प्रमोद मधुशन आणि कॅप्टन दासुन शनाका यांना प्रत्येकी एक बळी मिळाले. फिरकी गोलंदाज कार्तिक मयप्पनच्या हॅट्ट्रिकमुळे यूएईने श्रीलंकेला 8 बाद 152 धावांवर रोखले. T20 विश्वचषकात हॅट्ट्रिक घेणारा मयप्पन हा जगातील पाचवा गोलंदाज ठरला आहे. 2022 च्या टी-20 विश्वचषकातील ही पहिली हॅट्ट्रिक आहे. मात्र, यूएईच्या पराभवामुळे कार्तिकची हॅट्ट्रिक व्यर्थ गेली.

श्रीलंकेकडून पथुम निसांकाने सर्वाधिक 74 धावांची खेळी खेळली. त्याने 60 चेंडूत सहा चौकार आणि दोन षटकार मारले. त्याच्याशिवाय डी सिल्वाने 33 आणि कुसल मेंडिसने 18 धावा करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. निशांकाला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.