बस चालविताना चालकाला आली फिट, प्रसंगावधान राखत बस थांबविल्याने अनर्थ टाळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खेड एसटी आगारातून शिरगाव परिसरात प्रवाशी घेऊन जाणाऱ्या बसच्या चालकाला महामार्गावरील खोपी फाटा येथे अचानक फिट आल्याने बसमधील सुमारे 40 प्रवासी आणि विद्यार्थी यांचा जीव टांगणीला लागला होता. मात्र त्याही परिस्थितीत चालकाने प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या कडेला नेऊन सुरक्षित उभी केल्याने मोठा अनर्थ टळला. वेळ खराब असताना देखील चालकांना दाखविलेल्या प्रसंगावधानाचे करावे तितके कौतुक कमीच आहे. ही घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

खेड एसटी स्थानकातून शिरगाव परिसरातील प्रवाशांना घेऊन जाणारी नियमित एसटी बस शनिवारी देखील नेहमीच्या वेळेत सुटली. यावेळी बसमध्ये सुमारे 40 प्रवासी आणि काही शालेय विद्यार्थी होती. भरणे नका येथे आणखी काही विद्यार्थी आणि प्रवाशी या बसमध्ये बसले. ही बस जगबुडी पूल ओलांडून जेव्हा महामार्गावरील खोपी फाटा नजीक आली, तेव्हा बसचे चालक याना अचानक फीट आली आणि प्रवाशी आणि विद्यार्थ्यांनी भरलेली बस अनियंत्रित झाली.

बसला हेलकावे बसू लागल्याने बसमधील प्रवाशी घाबरून गेले. आता काय करायचे हा विचार प्रवाशी करत असतानाच त्या बहाद्दर चालकाने त्याही परिस्थितीत बस रस्त्याच्या कडेला घेतली आणि सुरक्षित उभी केली. हेलकावे खाणारी बस रस्त्याच्या कडेला सुरक्षित उभी राहल्ल्याचे लक्षात आल्यावर बसमधील प्रवाशांनी देवाचे आभार मानले.

या ठिकाणी जमलेला नागरिकांनी फीट आलेल्या चालकाला तत्काळ रुग्णवाहिका बोलावून कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. चालकांच्या प्रकृतीत सुधारणा होत असली तरी या घटनेने एसटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या आणि पर्यायाने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.