
छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर राजकारण करणाऱया ‘मिंधे’ सरकारच्या काळात मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ‘श्री शिव राजेश्वर’ मंदिराच्या देखभालीसाठी केवळ 500 रुपयांचा निधी दिला जात असल्याचा संतापजनक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे दीड वर्षापूर्वी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निधी वाढवण्याचे निर्देश दिले असताना प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे 500 रुपयांत शिवरायांच्या मंदिराची देखभाल कशी होणार असा सवाल उपस्थित झाला आहे.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे देशातील एकमेव मंदिर मालवण किल्ल्यावर आहे. सिंधुदुर्गमधील अरबी समुद्रात जलदुर्गावर असलेले हे मंदिर ‘श्री शिव राजेश्वर’ म्हणून प्रसिद्ध असून मंदिरात छत्रपतींचे दर्शन घेण्यासाठी दररोज शेकडो पर्यटक, नागरिक येत असतात. त्यामुळे या मंदिराची देखभाल, दुरुस्ती आणि रंगरंगोटी-स्वच्छता करण्यासाठी दररोज हजारो रुपयांची आवश्यकता आहे. त्यामुळे सरकारने तातडीने हा निधी देण्याची मागणी करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी 500 रुपये मिळणारा निधी वाढवण्याचे निर्देशही दिले. मात्र दीड वर्षानंतरही या आदेशांचे पालन झाले नसल्याने शिवप्रेमींमधून संताप व्यक्त केला जात आहे. शिवाय निधी वाढवण्याचे आदेश देऊनही कार्यवाही न करणाऱया अधिकाऱयांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही शिवप्रेमींमधून करण्यात येत आहे. हिंदू जागरण समितीने हा गंभीर प्रकार समोर आणला होता.
मिंध्यांकडून केवळ सत्तेसाठी शिवरायांचे नाव!
श्री शिव राजेश्वर मंदिरात रोजची स्वच्छता, दिवा-बत्ती, तेल, अगरबत्ती, रंगरंगोटी केवळ 500 रुपयांत कशी होणार असा सवाल शिवप्रेमींमधून उपस्थित केला जात आहे. ‘मिंधे’ सरकारकडून केवळ सत्तेसाठी शिवरायांच्या नावाचा वापर केला जात असल्याचा आरोपही शिवप्रेमी करीत आहेत.
महिन्याला 25 हजार रुपये द्या!
श्री शिव राजेश्वर मंदिरासाठी किमान 25 हजार रुपयांचा निधी द्यावा अशी मागणी करण्यात आली असून याबाबत राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदनही देण्यात आले आहे. दरम्यान, सध्याचे सरकार केवळ ‘घोषणा सरकार’ असल्याचा आरोप शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे. सरकारकडून केवळ श्रेय लाटण्यासाठी अनेक घोषणा करून जनतेची फसवणूक केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. शिवरायांच्या मंदिरासाठी हात आखडता का घेता, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
असे आहे मंदिराचे महत्त्व
– छत्रपती शिवाजी महाराज ‘शिव राजेश्वर’ मंदिराची उभारणी शिवरायांचे द्वितीय पुत्र राजाराम महाराज यांच्या कारकीर्दीत झाली आहे. या मंदिराची लांबी 17 मीटर आणि रुंदी 7 मीटर आहे. या मंदिरात असणाऱया शिवरायांच्या मूर्तीला दाढी नाही.
– वाय मूर्तीची वेशभूषा ही पारंपरिक नावाडय़ाची आहे. शिवरायांची मूर्ती पन्हाळ येथे तयार करण्यात आली असून सिंधुदुर्गावरील मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या ठिकाणी शिवरायांच्या तलवारींचेही जतन करण्यात आले आहे.































































