
क्रीडाप्रेमी आमदार आणि आयोजक सुनील राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या श्रीमान योगी प्रतिष्ठान व ओम साई क्रीडा मंडळ पुरुष व्यावसायिक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत स्थानिक महिला गटात राजमाता जिजाऊ, शिवशक्ती महिला, स्वराज्य स्पोर्ट्स यांनी, तर भारत पेट्रोलियम, मिडलाईन, मुंबई पोलीस, आयकर-पुणे यांनी व्यावसायिक पुरुषांत बाद फेरी गाठली.
कांजुरमार्ग (पूर्व) येथील परिवार मनोरंजन मैदानावर मॅटवर घेण्यात आलेल्या महिलांच्या ‘ब’ गटात पुण्याच्या राजमाता जिजाऊने उपनगरच्या संघर्षचा 62-14 असा सहज धुव्वा उडविला. मध्यांतराला 34-06 अशी भक्कम आघाडी घेणाऱया राजमाताने नंतरही तोच जोश कायम ठेवत गुणांचे अर्धशतक आरामात पार केले.
शिवशक्तीने ‘अ’ गटात नवशक्ती स्पोर्ट्सचा 46-12 असा पराभव करीत आपली डावेदारी आणखी पक्की केली. विश्रांतीला 23-04 अशी भक्कम आघाडी घेणाऱया शिवशक्तीने तोच जोश कायम ठेवत 34 गुणांच्या मोठय़ा फरकाने विजय मिळविला. स्वराज्य स्पोर्ट्सने ‘ड’ गटात कोल्हापूरच्या जिजाऊचा 59-14 असा सरळ पाडाव केला. पूर्वार्धात 27-07 अशी मोठी आघाडी घेणाऱया स्वराज्यने उत्तरार्धात देखील जोशपूर्ण खेळ करीत गुणांचे अर्धशतक पार केले. याशिका पुजारी, सानिया इंगळे यांच्या चढाई-पकडीच्या चौफेर खेळामुळे हा विजय सोपा गेला.
व्यावसायिक पुरुषांच्या ‘ब’ गटात भारत पेट्रोलियमने साई सिक्युरिटीला 29-17 असे नमवित बाद फेरीतील आपला मार्ग मोकळा केला. अक्षय सोनी, रोहन उके यांच्या झंझावाती खेळामुळे हा विजय सहज शक्य झाला.



























































