
सामना प्रतिनिधी, कल्याण
‘पार्टी विथ डिफरन्स’ असा डांगोरा पिटणाऱया भाजपच्या साधनशूचितेचा बुरखा पुन्हा एकदा टराटरा फाटला आहे. आपल्याच पक्षातील नगरसेवकाचा गेम वाजवण्यासाठी एक कोटीची सुपारी दिल्याप्रकरणी आधारवाडी जेलमध्ये चक्की पिसत असलेल्या महेश पाटील या वाल्याचा ‘आधारस्तंभ’ दुसरा-तिसरा कुणी नसून दस्तुरखुद्द राज्यमंत्री रवींद्र चव्हाण असल्याचे पाहून कल्याण-डोंबिवलीकरांच्या भुवया उंचावल्या आहेत. महेश पाटील याच्या वाढदिवसाची पानभर जाहिरात आज एका दैनिकात प्रसिद्ध झाली असून त्यात ‘आधारस्तंभ’ म्हणून रवींद्र चव्हाण यांची छबी झळकली आहे. कहर म्हणजे शुभेच्छुक म्हणून सुजित पाटील, विजय बाकाडे आणि सुजित नलावडे या नामचीन गुंडांचे फोटोही छापण्यात आले आहेत. हे तिघेही महेश पाटीलसोबत आधारवाडी जेलमध्ये शिक्षा भोगत आहेत.
डोंबिवलीचे भाजपचे नगरसेवक कुणाल पाटील यांना ठार मारण्यासाठी एक कोटीची सुपारी भाजपचेच डोंबिवलीतील गुंड प्रवृत्तीचे नगरसेवक महेश पाटील याने दिली होती. हे खळबळजनक सत्य पुढे आल्यानंतर महेश पाटील, सुजित पाटील, विजय बाकाडे, सुजित नलावडे यांच्यासह 11 जणांविरोधात हत्येचा कट रचल्याप्रकरणी भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. ठाणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाने या सर्वांना अटक करून आधारवाडी जेलमध्ये टाकले आहे. गुन्हा गंभीर असल्याने डिसेंबर 2017 पासून या सर्वांचा जामीनही झालेला नाही.
डोंबिवली प्रभाग 82 मधून महेश पाटील भाजप नगरसेवक म्हणून निवडून आले असून त्यांच्या गुंडागर्दीमुळे डोंबिवलीकर आधीपासूनच हैराण होते. त्याला भाजप आमदार आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचा वरदहस्त असल्याची दबक्या आवाजात चर्चा असायची. आज मात्र या दबक्या चर्चेला खुलेआम चर्चेचे स्वरूप आले.
महेश पाटील याच्या वाढदिवसाचे फलक डोंबिवलीत झळकले आहेत. यावर आधारस्तंभ म्हणून रवींद्र चव्हाण यांच्या छबीला ठळक प्रसिद्धी देण्यात आली. इतकेच नाही तर एका दैनिकात पानभर जाहिरात देऊन त्यामध्ये ‘आधारस्तंभ’ म्हणून महेश पाटीलच्या डोक्यावर रवींद्र चव्हाण यांचा फोटो छापण्यात आला आहे.
जेलबाहेर हॅप्पी बर्थडे?
ठाणे जिह्यातील वेगवेगळ्या सहा पोलीस ठाण्यांत 14 जबरी गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. सशस्त्र हाणामारी, हवेत गोळीबार, खंडणी, खुनाचा प्रयत्न आदी गुह्यांचा यामध्ये समावेश आहे. रविवारी मध्यरात्री आधारवाडी जेलमध्ये त्याचा वाढदिवस जल्लोषात साजरा झाल्यानंतर त्याला काही तासासाठी ‘मुक्त’ वातावरणात सोडल्याची चर्चा आहे.



























































