स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक – राष्ट्रवादी देणार 27 टक्के ओबीसी उमेदवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इतर मागासवर्ग समाजाला (ओबीसी) समाजाला न्याय मिळणे आमच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकूण उमेदवारांपैकी 27 टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देण्याचा निर्णय पक्षाने घेतल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी दिली.

ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा पेच अद्याप सुटलेले नाही. अशातच राज्यातील 92 नगरपालिका आणि 4 नगर पंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्थानिक निवडणुकीत एकूण उमेदवारांपैकी 27 टक्के उमेदवार ओबीसी समाजातून देण्याचा निर्णय घेतला आहे. ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयीन निर्णयाच्या प्रतीक्षेत आपण सर्वचजण आहोत.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सनदशीर मार्गाने सर्व प्रयत्न केले आहेत, असेही पाटील म्हणाले. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक होणे म्हणजे बहुसंख्य ओबीसी समाजावर घोर अन्याय आहे. आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत अशी राष्ट्रवादीची भूमिका असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसची आज बैठक

दरम्यान, पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होणार आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ आदींसह पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.