
सामना ऑनलाईन । पोर्ट ब्लेअर
अंदमान-निकोबार येथे अमेरिकन नागरिक जॉन अॅलन चाऊची हत्या झाल्यानंतर त्याचा मृतदेह मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. शनिवारी चाऊचा मृतदेह शोधण्यासाठी गेलेल्या पोलिसांना हातात धनुष्यबाण घेतलेल्या आदिवासींना सामोरे जावे लागले. आदिवासींच्या हातातील धनुष्य पाहून पोलीस पथकाला आल्या पावली परतावे लागले. तरीसुद्धा यानंतरही चाऊच्या मृतदेहाचा शोध सुरू ठेवणार असल्याची माहिती समोर येत आहे. असे असतानाच आता आदिवासी हक्कांचे संरक्षण करणाऱया ‘सर्व्हायव्हल इंटरनॅशनल’ या संस्थेने चाऊच्या मृतदेहाचा शोध घेऊ नये अशी विनंती करणारे पत्रकच जारी केले आहे. चाऊच्या मृतदेहाचा शोध घेणे हे शोधकर्त्यांना तसेच बेटांवरील संथाली लोकांसाठी धोकादायक ठरू शकते असे मत या संस्थेने व्यक्त केले आहे.

























































