
सामना प्रतिनिधी । संगमनेर
चार वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करून बस स्थानक परिसरात बसविण्यात आलेले सिग्नलवरचे दिवे ‘गायब’ झाले आहेत; परंतु नवीन बस स्थानकाच्या बांधकामाच्या धामधुमीत ते चोरीला गेले असल्याची चर्चा शहरात आहे. दिवे चोरीला गेलेत की काढून ठेवलेत, हेच पालिका प्रशासनाला माहीत नसल्याचे समोर आले आहे. सार्वजनिक मालमत्तेचा मनमानी पद्धतीने कसा वापर होऊ शकतो, याचे मूर्तिमंत उदाहरण ठरलेले हे सिग्नल अस्तित्वात आल्यापासून कधीही त्याद्वारे वाहतुकीचे नियमन झाले नाही. त्यापूर्वीच आता ते गायब झाल्याने संगमनेरकरांमधून संताप व्यक्त होऊ लागला आहे. शहराच्या विविध पाच ठिकाणी बसविलेल्या या यंत्रणेसाठी पालिकेने तब्बल 35 लाखांहून अधिक रक्कम खर्च केली आहे.
2016 साली झालेल्या संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी पालिकेने मोठा गाजावाजा करून संगमनेर बस स्थानक, हॉटेल कश्मीर, सह्याद्री विद्यालय, तीनबत्ती चौक व हॉटेल ‘राज पॅलेस’ अशा पाच ठिकाणी सिग्नलचे खांब उभे केले होते. शहर पोलिसांनी केलेल्या सूचनांकडे साफ दुर्लक्ष करून पालिकेने ही यंत्रणा उभी केली होती. त्यामुळे ही यंत्रणा उभी राहण्यापूर्वीच वादग्रस्त ठरली होती. तत्कालीन पोलीस निरीक्षकांनी ही यंत्रणा ‘सदोष’ असल्याचा गंभीर ठपका ठेवला होता. वाहतुकीचे प्रत्यक्ष नियमन करणाऱया पोलिसांनीच पालिकेला महत्त्वपूर्ण सूचना करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने पोलीस या यंत्रणेचा वापर करणार नसल्याची भूमिकाही त्यांनी घेतली. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात पालिकेने सिग्नल सुरू करूनही त्याद्वारे वाहतुकीचे नियमन होत नसल्याने संगमनेरकरांनी दीर्घकाळ सिग्नलचा तमाशाही अनुभवला.
पुढे पालिकेच्या या सिग्नलचा आधार घेऊन त्याभोवती अतिक्रमणेही दाटली. संगमनेर बस स्थानकाच्या नूतनीकरणाचे बहुतेक काम पूर्ण झाल्यावर ठेकेदाराने समोरील बाजूची अतिक्रमणे व टपऱया हटविल्यानंतर येथील सिग्नलचे खांब उघडे पडले. काही दिवसांनी त्यावरील दिवेही अचानक गायब करण्यात आले. आता बस स्थानक परिसरात केवळ सिग्नलसाठी उभारण्यात आलेले खांब दिसत आहेत.
तत्कालीन पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी बंद पडलेली संगमनेरची वाहतूक शाखा पुन्हा कार्यरत केली. या शाखेसाठी नव्याने स्वतंत्रपणे एक सहायक निरीक्षक व तब्बल 15 वाहतूक कर्मचारीही देण्यात आले. त्यांना विश्वासात घेऊन पालिकेने झालेल्या चुका सुधारण्याची व जनतेच्या पैशांची सुयोग्य विल्हेवाट लावण्याची अपेक्षा होती. मात्र, ती पूर्ण करण्याऐवजी 35 लाख खर्च करूनही केवळ खांबच शिल्लक राहिल्याने शहरातून संताप व्यक्त होऊ लागला आहे.
‘नवीन बस स्थानकासमोरील सिग्नलचे दिवे चोरीला गेलेत की काढून ठेवलेत, याची माहिती घेतो. चोरीला गेले नसतील बहुधा, ते काढून ठेवले असतील, तरीही चौकशी करून सांगतो.
– श्रीनिवास पगडाल, प्रशासन अधिकारी, नगरपालिका, संगमनेर.
‘बस स्थानकासमोरील सिग्नलचे दिवे कोणी काढले? कुठे नेले? याची माहिती घेण्यासाठी कर्मचारी पाठविले होते. मात्र, अद्यापि नेमकी परिस्थिती समजलेली नाही. बस स्थानकासमोरील परिसर मोठा व रुंद झाला आहे. त्यामुळे लवकरच सिग्नल व्यवस्था सुरू करायची होती. त्यात आता दिवे गायब झाल्याची समस्या उद्भवली असून, दिव्यांचा शोध सुरू आहे.’
– दुर्गा तांबे, नगराध्यक्षा, संगमनेर.


























































