बेस्टच्या वडाळा डेपाच्या कंत्राटी चालकांचे कामबंद आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेस्ट उपक्रमातील कंत्राटी चालकांच्या थकित पगारामुळे वडाळा आगारातील काही कंत्राटी चालकांनी आंदोलन पुकारल्याने गेले दोन दिवस मिनी बस सेवेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे बेस्टने आपल्या ताफ्यातील बसेसच्या जादा फेर्‍या चालवून प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

बेस्टमधील कंत्राटी चालकांनी पगार वेळेत मिळत नसल्याने काही काळापूर्वी आंदोलन केले होते. आता वडाळा आगारातील मिनी बस चालकांना अचानक कालपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. वडाळा आगारातून एम.पी. ग्रुपच्या 63 कंत्राटी चालकांनी बसेस बाहेल न काढल्याने प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे बेस्टने प्रवाशांच्या सुविधेसाठी आपल्या ताफ्यातील 27 जादा बस चालविल्या. रविवारीही वडाळा आगारातून 48 बस बाहेर पडल्या नाहीत. रविवारी बेस्टने 29 जादा बस चालविल्या, मात्र अजूनही कंत्राटी बसचालकांच्या मागण्या पूर्ण झाल्या नसल्याने उद्याही बसचा संप चालूच राहण्याची शक्यता आहे. यापूर्वी, मे महिन्यात वडाळा आगारासह पाच आगारांतील कंत्राटी चालकांनी पगार थकविल्याने आंदोलन केले होते.