
शाळेच्या कँटिनमधील आलू पॅटीस खाल्ल्यानंतर एका बारावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना जयपूरमध्ये घडली. विद्यार्थी जमिनीवर कोसळल्यानंतरही शाळा प्रशासनाने त्याला रुग्णालयात नेले नाही, असा आरोप त्याच्या पालकांनी केला आहे. ही घटना शाळेतील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. प्रिन्स सोनी असे या मयत विद्यार्थ्याचे नाव आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी सकाळी प्रिन्स नेहमीप्रमाणे शाळेत गेला. शाळेच्या कँटिनमध्ये त्याने आलू पॅटीस खाल्ली. यानंतर तो अचानक जमिनीवर कोसळला. शाळेतील कर्मचाऱ्यांनी त्याला उचलून वर्गात नेले. तेथे एका शिक्षकाने त्याला सीपीआर दिल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे.
सकाळी 11 च्या सुमारास प्रिन्सच्या वडिलांना त्याची तब्येत बिघडल्याचे फोनवरून सांगण्यात आले. शाळेपासून 35 मिनिटांच्या अंतरावर असल्याने प्रिन्सच्या वडिलांनी जवळ असलेल्या तात्काळ नातेवाईक आणि मित्राला तेथे पोहचण्यास सांगितले. यानंतर शिक्षिकेने पुन्हा फोन करून प्रिन्स बेशुद्ध असल्याचे कळवले. वडिलांनी शाळेत पोहचून प्रिन्सला तात्काळ रुग्णालयात नेले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
प्रिन्सची आई निर्मला यांनी सांगितले की, जेव्हा त्या शाळेत पोहोचल्या तेव्हा प्रिन्स काहीच बोलत नव्हता आणि त्याचे हात व चेहरा थंड पडले होते व निळसर झाले होते. शिक्षकांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून प्रिन्सला वेळीच रुग्णालयात नेले पाहिजे होते, असे त्याचे वडिल म्हणाले.
पालकांनी शिक्षण विभाग आणि पोलिसांकडे दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी शिक्षक आणि शाळेच्या मालकाची चौकशी केली आहे.



























































