पहिली ते आठवीचे विद्यार्थी सरसकट पास, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद मार्गदर्शक सूचना जाहीर करणार

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय सरसकट पास करण्याविषयी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद लवकरच मार्गदर्शक सूचना जाहीर करणार आहे. येत्या दोन दिवसांत या सूचनांची प्रत शाळांना दिली जाणार आहे.

कोरोनामुळे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला, मात्र या निर्णयाविषयीच्या लेखी सूचना शालेय शिक्षण विभागाकडून शाळांना न मिळाल्याने बहुसंख्य शाळांमध्ये वार्षिक परीक्षा घेतल्या जात आहेत. आपल्याकडे शिक्षण विभागाकडून कोणताही आदेश अथवा परिपत्रक मिळाले नसल्याचे सांगत अनेक शाळांनी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा सुरू ठेवल्या आहेत. सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळांनी तर परीक्षा उरकून पुढील शैक्षणिक वर्षाला सुरुवात केली आहे.

पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यासाठी त्यांना प्रमोट (वर्गोंन्नती) करण्याचा निर्णय जाहीर करून पाच दिवस उलटून गेल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनांबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना जाहीर करण्याचे आदेश राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेला दिले आहेत. त्यामुळे लवकरच या सूचना जाहीर केल्या जाणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या