
सामना ऑनलाईन । मुंबई
सलमान खानच्या सुपरहिट दबंग चित्रपटाच्या सिरीजमधील तिसरा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील नायकाच्या भूमिकेइतक्याच खलनायकाच्या भूमिकाही गाजल्या होत्या. त्यामुळे दबंग 3 मध्ये खलनायकाच्या भूमिकेत कोणता अभिनेता असणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली होती. अखेर दबंग-3 मधील खलनायकाच्या भूमिकेसाठी दक्षिणेकडील अभिनेता सुदीपचे नाव निश्चित झाले आहे.

‘सुदीप व सलमान हे चांगले मित्र आहेत. नुकतंच सलमानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून सुदीपच्या ‘पैलवान’ या चित्रपटाचे प्रमोशनही केले होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्या दोघांना एकत्र काम करायचे होते. अखेर दबंग-3 च्या निमित्ताने त्यांना ती संधी मिळाली आहे. दबंग-3 मध्ये सुदीपची भूमिका खलनायकाची आहे. प्रभुदेवाने सुदीपला स्क्रिप्ट पाठवली असून त्यावरून सुदीपने तत्काळ होकार कळविला आहे.’ असे सूत्रांनी दिलेल्या माहितीतून समजते. दरम्यान या चित्रपटात दोन खलनायक असणार असल्याचे देखील बोलले जात आहे. सुदीप व्यतिरिक्त तेलुगू अभिनेता जगपती बाबू हा देखील खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
सुदीप हा दक्षिणेकडी प्रसिद्ध अभिनेता असून दक्षिणेत त्याचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. सुदीपने बाहुबली – द बिगिनिंग या चित्रपटात देखील भूमिका केली होती. या चित्रपटात तो शस्त्रास्त्रांचा व्यापारी दाखवला होता.



























































