
सामना प्रतिनिधी, मुंबई
हिंदुस्थानी धावपटूंनी मुंबई मॅरेथॉन गाजवली असे म्हटले तरी यावेळी वावगे ठरणार नाही. एकीकडे सुधा सिंग हिने महिला गटातून तर दुसरीकडे नितेंद्रसिंग रावत याने पुरुष गटातून फुल मॅरेथॉन जिंकतानाच दोहा येथे होणाऱया वर्ल्ड चॅम्पियनशिपचे तिकीटही बुक केले. ही वाखाणण्याजोगी बाब.
नितेंद्रसिंग रावतने 2.15.52 अशी वेळ देत शर्यत जिंकताना उल्लेखनीय कामगिरी केली, मात्र चार सेंकदाने त्याचा विक्रम हुकला. गोपी थोनाकल याने धावताना ‘क्रॅम्प’ येऊनसुद्धा 2.17.03 अशा वेळेसह दुसरा क्रमांक पटकावला. 2014 व 2015 सालामध्ये मुंबई मॅरेथॉन जिंकणाऱया करण सिंगला तिसऱया स्थानावर समाधान मानावे लागले. त्याने 2.20.10 अशा वेळेसह शर्यत पूर्ण केली.
सर्वोत्तम कामगिरी
सेंट्रल रेल्वेच्या सुधा सिंगने यंदाच्या मुंबई मॅरेथॉनमध्ये आपली सर्वोत्तम कामगिरी केली. तिने 2.34.56 अशा वेळेसह हिंदुस्थानी महिला गटाची शर्यत जिंकली. तिने एकूण महिला गटात आठवा क्रमांकही पटकावला. पण सुधा सिंग ओ. पी. जैशाने केलेल्या हिंदुस्थानी विक्रमापासून 13 सेंकद दूर राहिली.
हाफ मॅरेथॉनमध्ये श्रीनू, मीनूची बाजी
श्रीनू बुगथा याने पुरुषांच्या गटात तर मीनू हिने महिलांच्या गटात हाफ मॅरेथॉन जिंकताना शानदार कामगिरी केली. श्रीनू बुगथाने 1.05.49 अशा वेळेसह शर्यत जिंकली. मीनूने 1.18.05 अशा वेळेसह अव्वल स्थान पटकावले. पुरुष गटात शंकर थापाने दुसरा व कालिदास हिरवेने तिसरा क्रमांक पटकावला. महिला गटात साईगीता नाईकने दुसरे तर मंजू यादवने तिसरे स्थान पटकावले.
लडाखच्या जिग्मेट दोलमा हिने 3.10.42 अशा वेळेसह फुल मॅरेथॉन हिंदुस्थानी महिला गटात तिसरा क्रमांक पटकावला. महाराष्ट्राच्या ज्योती गवतेने दुसरा क्रमांक आणि मोनिका राऊतने सातवा क्रमांक पटकावला.





























































