
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
महाराष्ट्राचे दैवत गीतकार ग. दि. माडगूळकर, गायक, संगीतकार सुधीर फडके आणि अष्टपैलू कलाकार पु. ल. देशपांडे या त्रयींची जन्मशताब्दी सुरू आहे. यानिमित्त चित्पावन ब्राह्मण सहाय्यक मंडळाने या त्रयीना संगीतमय आदरांजली वाहून त्यांच्या स्मृतीना उजाळा दिला.
सप्तसुर म्युझिकल्स आणि स्वये श्री रामप्रभू ऐकती, इंद्रायणी काठी, शब्दावाचून कळले सारे, आकाशा झेप घे रे, कबिराचे विणतो शेले, गं बाई माझी करंगळी अशा बहारदार गीतांनी संगीत मैफील रंगली. चित्पावन ब्राह्मण सहाय्यक मंडळाच्या श्री भगवान परशुराम सभागृहात कार्यक्रम संपन्न झाला. तीन तास रंगलेल्या त्रिवेणी या कार्यक्रमात अभिनेते विघ्नेश जोशी यांनी त्रयींच्या आठवणी सांगून रसिकांना मंत्रमुग्ध केले. सप्तसुर मुझिकल्सचे नीरंजन गोडबोले व विघ्नेश जोशी यांचा सत्कार कार्यवाह राजेंद्र पटवर्धन यांनी व कलाकारांचे स्वागत अविनाश काळे, संदीप रानडे, राधिका वैद्य, अनुजा आगाशे यांनी केले. प्रास्ताविक कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी केले.
अजिंक्य पोंक्षे याने स्वये श्री रामप्रभू ऐकती, इंद्रायणी काठी, शब्दावाचून कळले सारे, आकाशा झेप घे रे ही गीते सुरेल आवाजात म्हटली व टाळ्या घेतल्या. युवा गायिका हिमानी भागवतने कबिराचे विणतो शेले, हसले मनी चांदणे ही गीते सुरेख सादर केली. तर प्रियांका दाबके हिने एकाच या जन्मी, अहो सजणा दूर व्हा, गं बाई माझी करंगळी या गीतांना रसिकांनी दाद दिली. हरहुन्नरी गायक अभिजित भट याने कधी बहर कधी शिशिर, स्वर आले दुरूनी, नीजरूप दाखवा हो ही वैविध्यपूर्ण गीते तितक्याच ताकदीने म्हणली. अभय जोग यांनी पराधीन आहे जगती अजिंक्य व हिमानीने विकत घेतला श्याम, हिमानी व अभिजितने स्वप्नात रंगले मी, अभिजित व प्रियांकाने नवीन आज चंद्रमा ही द्वंद्व गीतेही तितकीच रंगली. वेद मंत्राहूनी आम्हा वंद्य वंदे मातरम या गीताने सांगता झाली.
हार्मोनियमसाथ निरंजन गोडबोले, कीबोर्ड चैतन्य पटवर्धन, व्हायोलिन उदय गोखले, तबला निखिल रानडे आणि तालवाद्य हरेश केळकर यांनी संगीतसाथ केली. रसिकांनी या कार्यक्रमाला अक्षरशः डोक्यावर घेतले. अनेकांनी अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करावेत, अशी प्रतिक्रिया चित्पावन ब्राह्मण मंडळाच्या पदाधिकार्यांकडे व्यक्त केली.





























































