पुणेकरांची आपुलकी, प्रेमाची शिदोरी घेवून शेतकरी कुटुंब परतले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

अभ्यंगस्नान, फाटाक्यांची अतिषबाजी, प्रेक्षणीय स्थळांना भेटी, मान्यवरांचे मार्गदर्शन व सहवास, पुणेकरांची आपुलकी, प्रेमाची शिदोरी घेवून शेतकरी कुटुंब सोमवारी (दि. 12) गावी परतले. या शेतकरी कुटुंबाला मान्यवरांच्या उपस्थितीत भावपूर्ण वातावरणात रविवारी सायंकाळी निरोप देण्यात आला तसेच पुन्हा येण्यासाठी आग्रहाचे निमंत्रण पुणेकरांनी दिले.

अर्धापूर तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबाचे सदस्य भोई फाऊंडेशनच्या निमंत्रणावरून पुण्यात दिवाळी साजरी करण्यासाठी गेले होते. पुण्यातील विविध नामवंत कुटुंबीयांच्या सानिध्यात यंदाची दिवाळी साजरी करण्यात आली. गेली दहा दिवस हे शेतकऱी कुटुंब पुण्यात होते. या दहा दिवसाच्या काळात या कुटुंबातील विद्यार्थ्यांनी संगिताचे धडे घेतले तसेच सुर तालाशी संगत केली. ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या. हे शेतकरी कुटुंब पुण्यातील कुटुंबाचे एक भाग झाले होते.

पुण्यातील पर्वती पायथ्याशी असलेल्या भारतमाता अभ्यासिकेच्या सभागृहात रविवारी सायंकाळी निरोपाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी विशेष महापोलीस निरीक्षक विठ्ठल जाधव, आमदार मेधा कुलकर्णी, एस.पी.महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप सेठ, ज्येष्ठ अभिनेत्री जयमाला इनामदार, नगरसेविका सरस्वती शेंडगे, सी.आय.डी. विभागाचे पोलीस अधिक्षक शेषराव सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

भोई फाऊंडेशनचे डॉ. मिलींद भोई यांनी प्रास्ताविक करून पुण्यजागर प्रकल्पाची माहिती देवून पुण्यातील विविध कुटुंबीयांचे आभार मानले. यावेळी मुलांच्या मनोरंजनाठी जादूच्या प्रयोगांचे आयोजन करण्यात आले होते. आमदार मेधा कुलकर्णी यांनी शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी आनेक निर्णय घेतली आहेत. शेतकरी सशक्त करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत असून शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन सदैव उभे आहे असे प्रतिपादन केले. तर विशेष पोलीस निरिक्षक विठ्ठल जाधव यांनी पुण्यजागर प्रकल्पाला सहकार्य करण्यात येईल आसा विश्वास दिला. तर प्राचार्य दिलीप सेठ, यांनी विद्यार्थ्यांनी खूप शिक्षण घेवून मोठे होण्याचा सल्ला दिला तसेच शिक्षणासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमाचे आभार लक्ष्मीकांत मुळे यांनी अभार मानले.

अनिल आरोळे यांनी गीत गायन करून निरोप दिला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिरीष मोहिते, राजाभाऊ कदम, सदाशिव कुंदेन, गुणवंत विरकर, सागर पवार, दिपक वनारसे, सुनील परदेशी, मनोज दंतकाळे, अप्पा गुडुसकर, लखन वाघमारे, भाऊ करपे यांनी पुढाकार घेतला. गेले दहा दिवस शेतकरी कुटुंब अजय शिंदे, सुनिल परदेशी, विभा बिजले, राजाभाऊ कदम, प्रवीण पोटे, राधिका मखमले, कल्पना उनावने, मानसी रानडे, राजेश जाधव, आजय बल्लाळ, डॉ. सुजता, संगीता चौरे, माधुरी जाधव यांच्या घरी वास्तव्यास होते.