नगर जिल्हाधिकारी कार्यालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

जिल्हाधिकारी कार्यालयातील पाचव्या मजल्यावर एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अविनाश चव्हाण असे या तरुणाचे नाव आहे. या घटनेने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.

नगरचे नवीन जिल्हाधिकारी कार्यालय नगर-संभाजीनगर महामार्गावर आहे. आज या कार्यालयावर पाचव्या मजल्यावर श्रीगोंद्यातील अविनाश चव्हाण याने विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी कार्यालयातील पोलीस कर्मचारी इरफान शेख यांनी प्रसंगावधान राखत या तरुणाला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. या तरुणाकडे सापडलेल्या चिठ्ठीत तो श्रीगोंदा तालुक्यातील घोटवी येथील असल्याचे समोर आले आहे. त्यात त्याने आपण घोटवी गावचा सरपंच असल्याचा उल्लेख केला आहे. या तरुणाने कशामुळे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, हे अद्यापि समजू शकले नाही.

यासंदर्भात नगर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीवरून गुन्हा नोंदवण्याचे काम उशीरापर्ययत सुरू होते.