कपालभातीचे सर्वाधिक स्ट्रोक, सुनील भुजबळ यांची ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

जगामध्ये एकाचवेळी कपालभातीचे सर्वाधिक स्ट्रोक्स मारण्याचा विक्रम योग शिक्षक सुनील बबन भुजबळ यांनी केला आहे आणि या विक्रमाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड-2019’ मध्ये झाली आहे.

सुनील भुजबळ यांनी एकाच बैठकीत सलग 21 मिनिटांमध्ये 4,833 कपालभातीचे स्ट्रोक्स मारले. मुंबईतील माटुंगा प. येथील योग विद्या निकेतनच्या दामले योग केंद्रामध्ये त्यांनी हे स्ट्रोक्स मारले. यावेळी प्रख्यात योगतज्ञ श्रीधर परब, दोन सरकारी राजपत्रित अधिकारी, दोन डॉक्टर्स परीक्षक म्हणून उपस्थित होते. याशिवाय योगाचे विद्यार्थी, जाणकारही यावेळी हजर होते.

या विक्रमाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग मुंबई दूरदर्शन आणि खासगी चॅनलने केले. याचा सर्व अहवाल ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ला जून 2018 मध्ये पाठवला. हा संपूर्ण अहवाल ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ने आपल्या तज्ञांमार्फत तपासून पाहिला. यानंतर सुनील भुजबळ हे जगातील सर्वाधिक कपालभातीचे स्ट्रोक्स मारणारे योग प्रशिक्षक ठरले आहेत अशी मोहोर ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ने उमटवली.