
राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसनला मोसमामधे चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल. तसेच त्या कामगिरीमध्ये सातत्य टिकवून ठेवावे लागेल, असे मत हिंदुस्थानचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी व्यक्त केले आहे. आयपीलच्या यंदाच्या मोसमामध्ये पहिल्या सामन्यात संजू सॅमसनने 119 धावांची शतकी खेळी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र, त्यानंतरच्या सामन्यांमध्ये त्याला समाधानकारक कामगिरी करता आली नाही. त्यामुळे राजस्थान रॉयल्सला सामने गमवावे लागले. शेवटच्या तीन डावात 4, 1 आणि 21 धावा संजू सॅमसन करू शकला आहे. एका सामन्यामध्ये धावा केल्यानंतर पुढच्या सामन्यांमध्ये धावा न केल्यामुळेच त्याला हिंदुस्थानच्या संघात स्थान मिळालेले नाही. पहिल्या फळीत जर उत्तम सुरूवात झाली तर मधल्या फळीतील फलंदाजांवर दबाव राहत नाही. मधल्या फळीतील फलंदाज देखील चांगल्या धावा फटकावून मोठे लक्ष उभे करू शकतात, असे सुनील गावसकर पुढे म्हणाले.





























































