तिसरा दिवस मुंबई, नवी मुंबईच्या संघांचा, नवी मुंबईचा उमर इलेव्हन ट्रायडंट, सलग दोन विजयांसह उपांत्य फेरीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जल्लोषपूर्ण वातावरण आणि क्रिकेटशौकिनांच्या तुडुंब उपस्थितीत कलिनाच्या एअर इंडिया स्पोर्ट्स क्लब क्रीडांगणावर सुरू असलेल्या नवव्या सुप्रिमो चषक क्रिकेट स्पर्धेचा तिसरा दिवस मुंबई आणि नवी मुंबईच्या संघांनी गाजवला.अफलातून फटके आणि थरारक क्षेत्ररक्षणाने लक्षणीय ठरलेल्या या दिवसाच्या खेळात नवी मुंबईच्या बलाढय़ उमर इलेव्हन ट्रायडंट संघाने आपले दोन्ही सामने सहज जिंकत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सहज धडक मारली. उमर इलेव्हनच्या या शानदार विजयाचे शिल्पकार ठरले ते धडाकेबाज फलंदाजी करणारे श्रेयस कदम आणि मुन्ना शेख. राज्याचे परिवहनमंत्री अॅड. अनिल परब आणि कलिनाचे शिवसेना विभागप्रमुख-आमदार संजय पोतनीस यांच्या कल्पक मार्गदर्शनाखाली खेळवण्यात येत असलेल्या या स्पर्धेची रंगत आणि थरार दिवसागणिक वाढतच आहे.

देशातील 16 संघांच्या या टेनिस आयपीएलला क्रिकेट रसिकांचा उदंड आणि अपूर्व प्रतिसाद रोज लाभत आहे. हायटेक संयोजनाने स्पर्धा अधिकच रंगतदार होत आहे. संयोजनाला ओघवत्या आणि माहितीपूर्ण मराठी, हिंदी, इंग्रजी आणि मालवणी समालोचनाची जोड लाभल्यामुळे ही स्पर्धा अतिशय रंगतदार होत आहे. कलिना-सांताक्रुझमधील हा क्रिकेट कार्निव्हल ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्यासाठी राज्यभरातून क्रिकेटशौकीन रोज येत आहेत. विशेष म्हणजे स्पर्धेला क्रिकेट, बॉलीवूड, सामाजिक, कला आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची रोज उपस्थिती लाभत आहे.

उमर इलेव्हनचा विजयी धडाका
नवी मुबईच्या उमर इलेव्हन ट्रायडंट संघाने आपल्या लौकिकास साजेसा धडाकेबाज खेळ करीत पहिल्या लढतीत कोलकाताच्या बेंगाल ब्रदर्स संघावर 20 धावांनी मात केली. या विजयात शेवटच्या 7 चेंडूंत 20 धावा फटकावणारा श्रेयस कदम याचा सिंहाचा वाटा होता. श्रेयसने 2 उत्तुंग षटकारांची नोंद केली. त्यामुळेच उमर इलेव्हनला 8 षटकांत 6 बाद 63 अशी मजल मारता आली. त्यानंतर राजू मुखिया याने 7 धावांत 3 फलंदाज बाद करीत बेंगाल ब्रदर्स कोलकाता संघाचा डाव 8 षटकांत 8 बाद 43 धावांतच गुंडाळला. दुसऱया लढतीत उमेश इलेव्हन वरळी एसपीपी संघाने कर्नाटकच्या एफएम इलेव्हन संघावर 5 विकेट राखून मात करीत शानदार विजयाची नोंद केली.

उपांत्यपूर्व लढतीतही उमरच बेस्ट
स्पर्धेच्या उपांत्यपूर्व लढतीतही उमर येळवं संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकांत 4 बाद 72 धावा केल्या. मुन्ना शेखने 22 चेंडूंत 36 धावा फटकावत संघाला ही मोठी धावसंख्या उभारून दिली. त्याच्या या खेळीत 1 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. त्यानंतर राजू मुखिया 5 धावांत 3 विकेट आणि भावेश पवार 20 धावांत 2 विकेट यांनी उमेश इलेव्हन, वरळी संघाचा डाव 8 षटकांत 7 बाद 52 या धावसंख्येतच गुंडाळत आपल्या सलग दुसऱया विजयावर शिक्कामोर्तब केले आणि दिमाखात उपांत्य फेरीत मजल मारली.

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचा विशेष सन्मान
सुप्रीमो क्रिकेट स्पर्धेला शुक्रवारी महाराष्ट्राचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी सुप्रिमोचे संयोजक, राज्याचे परिवहनमंत्री अॅड. अनिल परब आणि कलिना विधानसभेचे शिवसेना विभागप्रमुख-आमदार संजय पोतनीस यांच्या हस्ते एकनाथ शिंदे आणि शिवसेना सचिव-खासदार विनायक राऊत यांचा विशेष सन्मानचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या स्पर्धेला रणजीपटू शम्स मुलानी, आकर्षित गोमेल, माजी रणजीपटू दीपक जाधव, बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष आशीष चेंबूरकर, ज्येष्ठ क्रिकेट प्रशासक प्राध्यापक रत्नाकर शेट्टी, प्रो-कबड्डीपटू रिशांक देवाडिगा, आयपीएल क्रिकेटपटू शशांक सिंग आणि बॉलीवूडचे विनोदी अभिनेते राजकुमार कनोजिया आदी मान्यवरांनी भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.