माखजन इंग्लिश स्कूलच्या सूर्यनमस्कारांच्या संकल्पाची पूर्ती; रथसप्तमीला सांगता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शरीराला परिपूर्ण व्यायाम होण्यासाठी सूर्यनमस्कारांसारखा दुसरा पर्याय नाही. सूर्यनमस्कारांचा प्रचार व प्रसार होण्यासाठी माखजन इंग्लिश स्कूल व माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाने राबवलेला सूर्यनमस्कारांचा उपक्रम उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन सूर्यनमस्कारांचे ज्येष्ठ अभ्यासक विश्वनाथ बापट यांनी व्यक्त केले.

विश्वनाथ बापट म्हणाले की, विना खर्चात शरीराला व्यायाम मिळण्यासाठी सूर्यनमस्कार हा एक उत्तम पर्याय आहे. प्रत्येकाने किमान 12 सूर्यनमस्कार तरी घालावेत असे आवाहन केले. आयुष्यात लाखो, कोटी सूर्यनमस्कारांचे संकल्प करून ज्यांनी आपले आयुष्य सुर्यनामस्कारांसाठी जगले त्यांची कारकीर्द त्यांनी विशद केली. कार्यक्रमावेळी ज्ञान प्रबोधिनी निगडी पुणेचे आदित्य शिंदे यांनी मार्गदर्शन केले.यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापक मनोजकुमार नार्वेकर, गट प्रमुख नानासाहेब ठोंबरे,उपक्रम प्रमुख सचिन साठे उपस्थित होते.

शाळेने 1 लाख 51 हजार सुर्यनमस्कारांचा संकल्प 12 जानेवारी रोजी युवादिनी सोडण्यात आला होता.त्याची पूर्ती रथसप्तमीला झाली. या उपक्रमातंर्गत संकल्पापेक्षा अधिक सुर्यनमस्कार घालते गेले आहेत. 1 लाख 51 हजार सूर्यनमस्कारांचा संकल्प केला होता. मात्र, सुमारे पावणे तीन लाख सूर्यनमस्कार घालून झाले आहेत. आजच्या कार्यक्रमावेळी 200 विद्यार्थ्यांनी तसेच संस्थेचे सचिव राजेश फणसे यांनी शिस्तबद्ध पद्धतीने प्रत्येकी 21 सूर्यनमस्कार घातले. कार्यक्रमाच्या सुरुवातील विद्यार्थ्यांनी ईशस्तवन सादर केले. सूर्यनमस्कार उपक्रम राबवताना झालेले विविध कार्यक्रम, प्रसार, प्रचारातील फोटोसह थोडी माहिती व ठराविक अभिप्रायांची पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांच्या वजन, उंची व इतर झालेल्या उल्लेखनीय बदलांचा आढावा घेण्यात आला आहे.

प्रशालेतून उत्कृष्ट सूर्यनमस्कार घालणाऱ्या 13 मुलांना कार्यक्रमावेळी सन्मानित करण्यात आले.जास्तीत जास्त सूर्यनमस्कार घालणाऱ्या शिक्षकांमधून गौरव पोंक्षे, शिक्षकेतरमधून शैलेश उजगावकर, संतोष पड्यार यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी सेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सचिन कदम यांना सन्मानित करण्यात आले.