
कोरोनाचा मनोरंजन सृष्टीला मोठा फटका बसला असला तरी दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या बिग बजेट चित्रपटांनी पुन्हा एकदा सिनेमागृहांची चमक वाढवली आहे. अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ने पहिल्याच दिवशी 26.29 कोटींची घसघशीत कमाई करत आपल्यासह प्रेक्षकांचा पैसा वसूल केला आहे. दुसरीकडे सुपरस्टार ‘रजनीकांत’ यांच्या ‘अन्नत्थे’ने दोन दिवसांत 112 कोटींचा गल्ला जमवला आहे तर मार्व्हल स्टुडिओच्या ‘इटर्नल्स’ला 8.75 कोटींची बंपर ओपनिंग मिळाली आहे.
कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात एकही बिग बजेट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला नाही. कोरोनाची साथ आटोक्यात येताच राज्यात नियम आणि अटींसह 22 ऑक्टोबरपासून नाटय़-सिनेमागृहे सुरू झाली आहेत. चित्रपटगृहे उघडल्यानंतर काही चित्रपट प्रदर्शित झाले, परंतु त्यांचे कलेक्शन नगण्य होते. दिवाळीला प्रदर्शित होणाऱया सूर्यवंशीकडून प्रेक्षकांना अपेक्षा होत्या. अपेक्षेप्रमाणे तिकीट बारीवर चित्रपटाला भरघोस प्रतिसाद मिळतोय. वीकेण्डला हा चित्रपट शंभर कोटी क्लबमध्ये एंट्री करणार का, याकडे साऱयांचे लक्ष लागले आहे.
सेकंदाला सूर्यवंशीच्या 17 तिकिटांची विक्री
देशातील 3519 चित्रपटगृहांत सूर्यवंशी प्रदर्शित झाला आहे. बुक माय शोवर दर सेकंदाला या चित्रपटाच्या 17 तिकिटांची ऑनलाइन विक्री, तर 24 तासांत 7 लाख तिकिटांची विक्री झाली आहे. रजनीकांत यांच्या अन्नत्थे चित्रपटाने ऑनलाइन तिकीट बुकिंगमध्ये 1 मिलियनचा टप्पा पार ओलांडल्याचीही माहिती बुक माय शोने दिली आहे.



























































