भाजपचा आमदार असल्यामुळे गुन्हेगारी कृत्यांचे जणू यांना परमिटच मिळते, सुषमा अंधारे यांचे टीकास्त्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतीय जनता पक्षाचे आमदार सुनिल कांबळे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही घटना घडली आहे. यावरून सध्या भाजपवर टीका होत आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील या प्रकरणावरून भाजप व आमदार सुनील कांबळे यांना फटकारले आहे. ”भाजपचे आमदार सुनील कांबळे हे सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करत असतात. दादागिरी व अर्वाच्या भाषेसाठी कुप्रसिद्ध आहे. दोन वर्षांपूर्वी आमदार सुनील कांबळे यांनी पुणे महापालिकेच्या एका महिला अभियांत्रिकेला अर्वाच्या भाषेत अत्यंत अभद्र शिवीगाळ केली होती. एक वर्षापूर्वी आनंद नगर झोपडपट्टीतील बिल्डरशी संगनमत करून लोकांनाल दमदाटी केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आज त्यांचा दादागिरी करत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याचा अर्थ सुनील कांबळे यांना आधीच समज दिली असती किंबहुना त्यांचे निलंबन झाले असते. तर भाजप अशा कोणत्याही लोकप्रतिनिधीचे निलंबन करत नाही. भाजपचे आमदार असतील तर त्यांनी अधिकाऱ्यांना मारहाण करावे, पत्रकांरांना जिवे मारण्याची धमकी द्यावी, महिला अधिकाऱ्यांशी अभद्र भाषा वापरावी, त्यांच्या जवळच्या चाटू गिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्यांच्या लेकीबाळींना गाडीखाली चिरडावे. व त्यांना गृहखाते काहीही करणार नाही. ही सध्याची भाजप शाशित सरकारची तऱ्हा आहे.