राजस्थानात पाचवा ड्रोन उडवला, पाकिस्तानने मनसुबे उधळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । जयपूर

राजस्थानमधील श्रीगंगानगर जिल्ह्यात हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेवर एक संशयास्पद ड्रोन फिरत होता. पाकिस्तानचा हा ड्रोन हिंदुस्थानी सैन्याने गोळीबार करून पाडला आहे. गेल्या काही दिवसांपासून हिंदुस्थानी सैन्याने पाडलेला हा आतापर्यंतचा पाचवा ड्रोन आहे.

मंगळवारी सकाळी राजस्थानमधील श्रीगंगानगर जिल्ह्यात हिंदुमलकोट पोलीस ठाण्याच्या हद्दीत सैन्यदलाच्या प्रचंड गोळीबारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांच्या माहितीनुसार, संशयास्पद ड्रोन दिसल्यानंतर जवळपास अर्धातास या परिसरात गोळीबार सुरू होता. हिंदुस्थानी सैन्याने गोळीबार करून हा संशयास्पद ड्रोन पाडला आहे. दरम्यान, शनिवारी देखील एका पाकिस्तानी ड्रोनने हिंदुस्थानात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र जवानांनी गोळीबार करून तो पिटाळून लावला होता. हिंदुस्थानी सैन्याने या अगोदरही श्रीगंगानगर परिसरात, तसेच बिकानेर येथील नाल सेक्टर आणि इतर वेगवेगळ्या ठिकाणी चार ड्रोन पाडले आहेत.