महिला सुरक्षेची ऐशी तैशी! मिंधे गटाच्या सुरक्षेसाठी ‘निर्भया’ फंडातून खरेदी केलेल्या गाड्यांचा वापर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया फंडातून खरेदी केलेल्या गाड्यांचा वापर मिंधे गटाच्या खासदार आणि आमदारांना सुरक्षा देण्यासाठी केला जात आहे. महिलांवरील गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी ही वाहने पोलिसांच्या ताफ्यात होती. मात्र या वाहनांचा वापर यंदाच्या जुलैपासून एकनाथ शिंदे यांच्या गटातील खासदार आणि आमदारांसाठी एस्कॉर्ट वाहन म्हणून केला जात आहे. या वर्षी जूनमध्ये, मुंबई पोलिसांनी 220 बोलेरो, 35 अर्टिगा, 313 पल्सर बाईक आणि 200 अ‍ॅक्टिव्हा 30 कोटींहून अधिक खर्च करून खरेदी केल्या. केंद्राने 2013 मध्ये राज्य सरकारांसाठी योजना राबविताना स्थापन केलेल्या निर्भया फंडांतर्गत या गाड्या खरेदी केल्या. महिलांच्या सुरक्षेसाठी एक निधी तयार करण्यात आला होता ज्याला निर्भया फंड असे नाव देण्यात आले. जुलैपर्यंत ही वाहने पोलीस ठाण्यांमध्ये वितरित करण्यात आली होती.

मिंधे गटातील सर्व 40 आमदार आणि 12 खासदारांना ‘वाय प्लस विथ एस्कॉर्ट’ सुरक्षा पुरवली जात आहे. ‘वाय-प्लस विथ एस्कॉर्ट’ श्रेणी सुरक्षा असलेल्यांना एक एस्कॉर्ट वाहन आणि पाच पोलीस मिळतात, जे चोवीस तास कर्तव्यावर असतात.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, नवीन बोलेरोचे गाड्यांचे विविध पोलीस युनिट्समध्ये जूनमध्ये वाटप करण्यात आले होते. अनेक पोलीस ठाण्यांमध्ये वाहनांची कमतरता होती. शहरातील 95 पोलीस ठाण्यांमध्ये या बोलेरो पाठवण्यात आल्या होत्या. गरजेनुसार काही पोलीस ठाण्यांना एक बोलेरो मिळाली, काहींना दोन मिळाल्या.

वाहनांची व्यवस्था करण्याची जबाबदारी असलेल्या मोटार वाहतूक विभागातील सूत्रांनी सांगितले की, व्हीआयपी सुरक्षेसाठी शहरातील विविध पोलिस ठाण्यांमधून 30 पेक्षा अधिक वाहने तात्पुरत्या स्वरूपात मागवण्यात आली. याबद्दल आयजी कृष्ण प्रकाश यांनी सांगितले की, या वाहनांची मागणी केली नव्हती. तर आमदारांच्या सुरक्षेसाठी संसाधने उपलब्ध करून देण्याचा आदेश जारी केला होता.