
केंद्रीय मंत्रालयाच्या ‘स्वदेश दर्शन योजना भाग-2’मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश करून पर्यटनाच्या दृष्टिने नविन डीपीआर बनविण्यात यावा. तसेच त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देत स्वदेश दर्शन योजनेची त्वरीत अंमलबजावणी करावी, अशी आग्रही मागणी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव, संसदीय गटनेते तथा रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांनी सोमवारी केंद्रीय पर्यटन मंत्री जी. कृष्ण रेड्डी यांच्याकडे केली. या मागणीची रेड्डी यांनी तात्काळ दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन खात्याला लवकरात लवकर याबाबतचा डीपीआर केंद्र सरकारकडे सादर करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती विनायक राऊत यांनी दिली.
खासदार विनायक राऊत यांनी केंद्रिय पर्यटन मंत्री जी.कृष्णा रेड्डी यांची दिल्ली येथे भेट घेतली. विनायक राऊत यांनी केंद्रिय पर्यटन मंत्री रेड्डी यांना दिलेल्या निवेदनात असे नमुद केले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात नयनरम्य समुद्र किनारे, ऐतिहासिक वास्तु, जलक्रिडा, वनस्पती आणि प्राणी आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वर्षभर देश-विदेशातील लाखो पर्यटक येत असतात. सिंधुदुर्ग जिल्हा हवाई मार्गाने जोडला गेला असल्यामुळे पर्यटकांची संख्या अधिकच वाढत आहे. म्हणूनच केंद्रिय मंत्रालयाच्या स्वदेश दर्शन योजना भाग – 2 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश करून नवीन डीपीआर बनवून त्याची त्वरीत अंमलबजावणी करावी. तसेच त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून द्यावा.