छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱया राज्यपालांना हटवा; अन्यथा जनआंदोलन, स्वराज्य संघटनेचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानास्पद वक्तव्य करणाऱया राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना त्वरित हटवा; अन्यथा जनआंदोलनातून होणाऱया परिणामांस मुख्यमंत्र्यांसह प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा स्वराज्य संघटनेकडून देण्यात आला आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.

कोश्यारी हटाव मोहिमेत संभाजीराजे छत्रपती यांच्यासह स्वराज्य संघटना आक्रमक झाली आहे. राज्यात ठिकठिकाणी स्वराज्य संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयात आज भगतसिंह कोश्यारी यांना त्वरित राज्यपाल पदावरून हटविण्याची मागणी करण्यात आली. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातही प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांना निवेदन देण्यात आले.

भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल पदावर नियुक्त झाल्यापासून येथील महापुरुष व महाराष्ट्र राज्याची अस्मिता यांबाबत वारंवार वादग्रस्त व अवमानकारक वक्तव्ये करीत आहेत. नुकतेच छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अत्यंत अवमानकारक वक्तव्य करून त्यांनी जनतेच्या भावनेशी खेळ केला आहे. यापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्याबाबत पातळीहीन वक्तव्य करून या महान दाम्पत्याच्या कार्याची त्यांनी अवहेलना केली आहे. त्यामुळे कोश्यारी यांना वेळीच आवर घालून महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरून त्यांची ताबडतोब हकालपट्टी करावी; अन्यथा जनतेच्या भावनेचा मोठा उद्रेक होईल, असेही ठणकावले आहे.

यावेळी विनायक फाळके, रवींद्र पाटील, हेमंत साळोखे, सुखदेव गिरी, संजय घाटगे, अमर पाटील, उदयसिंह घोरपडे, शाहीर शहाजी माळी, राम यादव, प्रसन्न मोहिते, प्रवीण हुबाळे, राजू खोत आदी उपस्थित होते.

गेटवे ऑफ इंडिया ते राजभवन ‘कोल्हापुरी चप्पल मार्च’ काढणार!

z छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमचा स्वाभिमान आहे. आमच्या स्वाभिमानाला कुणी वारंवार डिवचत असेल, तर त्यालाही गाडल्याशिवाय राहणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राबद्दल वारंवार बेताल वक्तव्य करणाऱया राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना 15 दिवसांत राज्यपाल पदावरून हटवावे; अन्यथा मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया ते राजभवनपर्यंत ‘कोल्हापुरी चप्पल मार्च’ काढून लायकी दाखविण्यात येईल, असा इशारा शिवभक्त लोकआंदोलन समितीकडून देण्यात आला.