‘टीम इंडिया’ची विजयी दिवाळी भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कोलकाता

गोलंदाजांनी वर्चस्व गाजविलेल्या सलामीच्या टी-20 क्रिकेट सामन्यात ‘टीम इंडिया’ ने वेस्ट इंडीजला 5 गडी व 13 चेंडू राखून धूळ चारत चाहत्यांना विजयाची दिवाळी भेट दिली. भन्नाट गोलंदाजी… दिनेश कार्तिकची अनुभवी इनिंग आणि पदार्पणवीर कृणाल पंडय़ाची अष्टपैलू कामगिरी ही हिंदुस्थानच्या विजयाची वैशिष्टय़े ठरली. 3 विकेट मिळवणारा कुलदीप यादव सामन्याचा मानकरी ठरला.

विंडीजकडून मिळालेल्या 110 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना एक वेळ हिंदुस्थानची 4 बाद 45 अशी अवस्था झाली होती. कर्णधार रोहित शर्मा (6), शिखर धवन (3) या सलामीच्या जोडीला पदार्पणवीर ओशान थॉमसने लागोपाठच्या षटकांत बाद करून विंडीजला आश्वासक सुरुवात करून दिली होती. कर्णधार कार्लोस ब्रॅथवेटने रिषभ पंत (1) व लोकेश राहुल (16) यांना बाद केले. मनीष पांडे 19 धावांवर बाद झाल्यानंतर दिनेश कार्तिक (नाबाद 31) व कृणाल पंडय़ा (नाबाद 21) यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली. विंडीजकडून थॉमस व ब्रॅथवेट यांनी 2-2 फलंदाज बाद केले.

त्याआधी नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीजला 8 बाद 109 धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. उमेश यादवने तिसऱयाच षटकात दिनेश रामदीनला (2) यष्टीमागे कार्तिककरवी झेलबाद करून हिंदुस्थानला सनसनटी सुरुवात करून दिली. त्यानंतर 10 चेंडूंत तीन खणखणीत चौकार मारणारा शाई होप (14) धावबाद झाला. मग जसप्रीत बुमराहने सिमरोन हेटमायरला (10) यष्टीमागे झेलबाद करून विंडीजला मोठा धक्का दिला. अनुभवी कायरॉन पोलार्डला (14) पदार्पणवीर कृणाल पंडय़ाने मनीष पांडय़ेकरवी झेलबाद करून हिंदुस्थानला मोठे यश मिळवून दिले. त्यानंतर कुलदीप यादवने डॅरेन ब्राव्हो (4), रोवमन पॉवेल (4) व कर्णधार कार्लोस ब्रॅथवैट (4) यांना बाद करून विंडीजची मधली फळी कापून काढली. तळाला पदार्पणवीर फॅबियन एलेनने 27, तर किमो पाउल (नाबाद 15) यांनी दुहेरी धावा केल्या म्हणून विंडीजला धावांची शंभरी ओलांडता आली.