
कश्मीर खोऱयात पुन्हा ‘टार्गेट किलिंग’ची प्रचंड दहशत वाढली आहे. मंगळवारी कुलगामच्या गोपालपोरा भागात दहशतवाद्यांनी शाळेत घुसून अंदाधुंद गोळीबार केला आणि विद्यार्थिनींसमोरच कश्मिरी पंडित शिक्षिकेची निर्घृण हत्या केली. रजनी बाला असे शिक्षिकेचे नाव आहे. जम्मू-कश्मीरमधील कलम 370 रद्द झाल्यानंतर दहशतवाद्यांनी चार कश्मिरी पंडितांसह 14 हिंदूंच्या हत्या केल्या. त्यामुळे खोऱयातील हिंदूंची सुरक्षा ‘रामभरोसे’च आहे.
मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास दहशतवादी शाळेत घुसले. त्यांनी सांबा येथील हिंदू शिक्षिका रजनी बाला यांच्यावर अनेक गोळय़ा झाडल्या. गंभीर जखमी झालेल्या रजनी यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांची पर्स आणि शूज शाळेच्या आवारातच पडली होती. दहशतवाद्यांनी त्यांच्या डोक्यावर गोळय़ा झाडल्याचे एका स्थानिकाने सांगितले. हत्येच्या घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली. रजनी दररोज 10 किमीची पायपीट करीत गोपालपोराच्या शाळेत यायच्या. दहशतवाद्यांनी पुन्हा ‘टार्गेट किलिंग’ सुरू केल्यामुळे स्थानिक पोलीस तसेच इतर सुरक्षा दले ‘हाय अॅलर्ट’ झाली आहेत. रजनी यांच्या हत्येनंतर शिक्षकांनी तीव्र निदर्शने सुरू केली. कश्मीर पंडितांनी बीबी कॅण्ट रोड रोखला. दरम्यान, पुलवामा जिह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये जोरदार चकमक उडाली. त्यात दोन स्थानिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
विद्यार्थिनी बेशुद्ध
दहशतवाद्यांनी शिक्षिकेवर केलेल्या अंदाधुंद गोळीबारामुळे संपूर्ण वर्गात रक्ताचा मोठा सडा पसरला होता, तर शिक्षिका रजनी रक्ताच्या थारोळय़ात पडल्या होत्या. शाळेतील हत्येचा घृणास्पद प्रकार पाहून प्रचंड दहशतीखाली गेलेल्या विद्यार्थिनी वर्गातच बेशुद्ध पडल्या.
- 2 मार्च 2022 : कुलगाम येथील संदू ग्रामपंचायत सदस्याची हत्या
- 9 मे 2022 ः शोपियामध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात एक नागरिक ठार
- 12 मे 2022 ः पुलवामात रियाज अहमद ठाकोर या पोलिसाची हत्या
- 12 मे 2022 ः कश्मिरी पंडित राहुल भट्ट यांची बडगाम येथे हत्या
- 17 मे 2022 ः बारामुल्ला येथे वाइन शॉपवर ग्रेनेड हल्ला. रणजित सिंह यांचा मृत्यू
- 24 मे 2022 ः पोलीस कर्मचाऱयाची घरात घुसून हत्या. सात वर्षांची मुलगी जखमी
- 25 मे 2022 ः कश्मिरी अभिनेत्री अमीरा भट्ट यांची गोळय़ा घालून हत्या
























































