
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
महानगरपालिकेचे नगररचना विभागातील शाखा अभियंता शिवदास भग्गू राठोड आणि ट्रेसर मजहर अली महंमद अली यांना आज आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. टीडीआरसाठी अब्दुल सिकंदर यांनी सादर केलेला कोरा अर्ज मजहर अली यांनी आवक रजिस्ट्ररमध्ये नोंदवून घेतला आणि शिवदास राठोड यांनी कसलीही शहानिशा न करता त्यावर टीडीआर देण्यासंदर्भात शेरा लिहिला असल्याचा आरोप या दोघांवर आहे.
दोघांना अटक केल्यानंतर आता त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असून आर्थिक गुन्हे शाखेला या प्रकरणात या अधिकाऱ्यांकडून काहीही तपास करायचा नसल्याने आर्थिक गुन्हे शाखेने दोघांनाही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याचे आदेश व्हावेत, अशी विनंती केली. न्यायालयाने न्यायालयीन कोठडीचा अर्ज मंजूर केला. त्यानंतर आरोपी शाखा अभियंता आणि ट्रेसर यांच्यातर्फे नियमित जामीनसाठी अर्ज करण्यात आला. परंतु, सरकारी वकिल एस आर ढोकरट यांनी पोलिसांची बाजू मांडली. त्यानंतर दोघा आरोपींची रवानगी हर्सुल जेलमध्ये करण्यात आली.
याशिवाय संबंधित टीडीआर देण्यासंदर्भात ज्या ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश होता. त्यांचाही पोलीस शोध घेऊ लागले असून आता हे संबंधित अधिकारी बचावाचे प्रयत्न करु लागले आहेत. दरम्यान, इकडे पोलिसांचे अटकसत्र सुरू होताच मनपाच्या नगररचना विभागातील टीडीआरच्या एकेक फायली गायब होऊ लागल्या आहेत. पडेगाव गट नंबर ६ मधील एक टीडीआर मंजूर केल्याची फाईल आज गायब झाली असून ती ज्या अधिकाऱ्याच्या टेबलवरून गायब झाली आहे त्याने स्वेच्छानिवृत्तीसाठी हालचाली सुरू केल्या असल्याचे कळते. अब्दुल सिकंदर यांची सराफा रोडवर एक मालमत्ता होती. त्याचा काही भाग रस्ता रुंदीकरणात जात होता. त्यांनी तो भाग मनपाला भूसंपादित करून दिला आणि त्याचा मोबदला म्हणून ८ लाख २५ हजार रुपये मनपाकडून घेतले. नंतर त्यांचा मृत्यू झाला. यानंतर मनपात अब्दुल सिकंदर यांनी त्याच मोबदला मिळालेल्या जागेचा टीडीआर मिळावा म्हणून मनपात अर्ज केला. त्याच्या जबानीनुसार त्याचा हा अर्ज कोरा होता, अर्ज कोरा असल्याचे माहिती असूनसुध्दा मजहर अली यांनी हा अर्ज इनवर्ड करून घेतला. तर अर्ज कोरा असल्याचे माहिती असूनसुध्दा शिवदास राठोड यांनी सिकंदर यांना टीडीआर मिळावा, अशा स्वरुपाचे नोिंटग तयार करुन ही फाईल पुढे पाठवली. अशा प्रकारे त्यांनी घोटाळ्यास हातभार लावल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. महापालिकेत हा घोटाळा माजी महापौर विमल राजपूत यांचा मुलगा किशोर राजपूत यांनी उघडकीस आणला. घोटाळा समोर आल्यानंतरसुध्दा मनपा अधिकाऱ्यांनी प्रकरण मिटवण्याचे युध्दपातळीवर प्रयत्न केले. एवढेच नव्हे, तर या घोटाळ्यात संशयित असल्याचे माहिती असूनसुध्दा मनपा आयुक्त निपुण विनायक यांनी शिवदास राठोड यांची पुन्हा नगररचना विभागातच बदली करून एकप्रकारे राठोड यास घोटाळ्यात सहभागी झाल्याबद्दल बक्षीसच दिले. आयुक्तांच्या या भूमिकेमुळे आता आयुक्तांची सुध्दा प्रतिमा मलीन झाली आहे.
टीडीआर घोटाळ्याची चौकशी करणार – महापौर
महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले, आर्थिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले यांनी आज बुधवारी सकाळी माझी भेट घेऊन टीडीआर प्रकरणी गुन्हा दाखल असल्यामुळे चौकशीअंती मनपाच्या नगररचना विभागातील दोन अधिकाऱ्यांना अटक करण्यापूर्वी संस्थेचे प्रमुख या नात्याने मला माहिती दिली. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी आयुक्तांना पत्र देण्यात येईल. मनपा वर्धापनदिन दोन दिवसांवर आला असतानाच कर्मचाऱ्यांवर ही पोलीस कारवाई झाली आहे.
































































