
सांताक्रूझ पोलिसांनी गुरुवारी एका शिक्षकाला अटक केली आहे. ऑनलाईन वर्ग भरलेला असताना या शिक्षकाने त्याच्या वर्गातील 10 वर्षांच्या विद्यार्थिनीला अश्लील स्टीकर्स पाठवले होते. रविवारी आणि सोमवारी असे दोन दिवस या शिक्षकाने विद्यार्थिनीला हे स्टीकर्स पाठवले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 6 आणि 7 सप्टेंबरला या शिक्षकाने विद्यार्थिनीला व्हॉटसअप केला होता.
रविवारी शिक्षकाने विद्यार्थिनीला हे स्टीकर्स पाठवले होते, मात्र नंतर त्याने ते डिलीट केले होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी पुन्हा त्याने हे स्टीकर्स विद्यार्थिनीला पाठवले. शिक्षकाच्या या कृत्यामुळे धास्तावलेल्या विद्यार्थिनीने हा प्रकार तिच्या पालकांना सांगितला. पालकांनी तत्काळ पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार नोंदवली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी या शिक्षकाला गुरुवारी अटक केली आणि न्यायालयासमोर हजर केलं. या शिक्षकाला न्यायालयाने 14 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या शिक्षकाने इतर कोणत्या विद्यार्थिनीसोबत असा प्रकार केला आहे का याचा पोलीस आता शोध घेत आहेत. पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुंबई मिररने याबाबतचे वृत्त दिले आहे.

























































