सहकारी शिक्षकावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या दुसऱ्या शिक्षकास दहा वर्ष सक्तमजुरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधीक

सामना प्रतिनिधी, नांदेड

पगार न काढणाऱ्या आपल्या सहकारी शिक्षकावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या शिक्षकाला नांदेडच्या न्यायालयाने दहा वर्ष सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये रोख दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

सिडकोमध्ये राहणारे किशनराव रामराव येवले (४२) आणि राजेश नागनाथ वाघमोडे (४३) हे दोघे गणपतराव मोरे विद्यालय किवळा येथे एकत्र कार्यरत होते. किशनराव येवले यांच्यावर शिक्षकांचे पगार काढण्याची जबाबदारी होती. राजेश नागनाथ वाघमोडे यांच्या काही गैरहजेरीमुळे शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांचे पगार बिल रोखले. दरम्यान किशनराव येवले यांची बदली संत मोतीराम महाराज हायस्कूल कारेगाव ता.लोहा येथे झाली. पण त्यांचे घर सिडको येथील संभाजी चौकात होते. किशनराव येवले हे पगारीचे बिल काढत नसल्याचा राग मनात धरून १५ सप्टेंबर २०१२ रोजी रात्री आठ ते साडेआठ या वेळेदरम्यान किशनराव येवले आणि त्यांच्या पत्नी दैवशाला येवले या आपल्या घरातील मोकळ्या प्रांगणात बोलत उभे असताना राजेश वाघमोडे तेथे आला आणि त्याने आपल्या जवळील चावूâने किशनराव येवले यांच्यावर चाकूने वार केले.

यात किशनराव येवले गंभीर जखमी झाले. या प्रकरणी दैवशाला येवलेच्या तक्रारीवरुन राजेश वाघमोडेविरुद्ध दंडविधानाच्या कलम ४५२ आणि ३०७ नुसार गुन्हा दाखल झाला. पोलीस उपनिरीक्षक सुरेश उनवणे यांनी राजेश वाघमोडेला अटक केली आणि जीवघेणा हल्ला प्रकरणाचा सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. बऱ्याच दिवसानंतर राजेश वाघमोडेला जामीन मिळाली. पण तो न्यायालयात तारखेवर हजर राहत नसल्याने त्याच्याविरुध्द पकड वारंट जारी करण्यात आले. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस हवालदार धोंडीराम केंद्रे यांनी राजेश वाघमोडेला साईनगर हडको येथून पकडून आणले.

त्यानंतर मात्र न्यायालयाने त्याला जामीन दिला नाही. या खटल्यात एकूण सात साक्षीदारांनी आपले जबाब नोंदवले. उपलब्ध पुरावा आधारे पहिले जिल्हा न्यायाधीश ए.जी. मोहाबे यांनी शिक्षकाची नौकरी गमावलेल्या राजेश नागनाथ वाघमोडेला शिक्षक किशनराव येवलेवर जिवघेणा हल्ला केला म्हणून दोषी मानले. कलम ३०७ नुसार दहा वर्ष सक्तमजुरी आणि कलम ४५२ नुसार सात वर्ष सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. या दोन्ही शिक्षा राजेश वाघमोडेला एकत्र भोगायच्या आहेत. या खटल्यात सरकार पक्षाची बाजू अ‍ॅड.अमरीकसिंघ वासरीकर यांनी मांडली. तर आरोपी शिक्षक वाघमोडेचे वकील अ‍ॅड.प्रवीण आयाचित हे होते.