
सामना ऑनलाईन । गुरुग्राम
मुले वर्गात गोंधळ घालत असल्याने गुरुग्राममध्ये एका खासगी शाळेत एका शिक्षिकेने नर्सरीतील चार वर्षाच्या दोन मुलांच्या तोंडाला सेलोटेप चिकटवल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या घटनेनंतर पालकांच्या तक्रारीनंतर शिक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे. शाळेतील अधिकाऱ्यांनी शिक्षिकेवर करण्यात आलेल्या कारवाईची माहिती देण्यात आली.
वर्गात सर्व मुले गोंधळ घालत होती. त्यात एक मुलगा आणि मुलगी सर्वात जास्त गोंधळ घालत होते. तसेच अर्वाच्य भाषेच बोलत होते. त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव व्हावी म्हणून त्यांच्या तोंडाला सेलोटेप चिटकवल्याचे शिक्षिकेने सांगितले. ही घटना ऑक्टोबरमधील असून या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने शिक्षेकेबाबत सर्व स्तरातून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. या घटनेची माहिती त्या मुलांच्या पालकांना मिळाल्यानंतर त्यांनी शाळा व्यवस्थापनाकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर या शिक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे. शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबतचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आला आहे. एवढ्या लहान वयात मुलांना अशी शिक्षा करणे योग्य नाही. त्यामुळे त्यांच्या मनात भिती निर्माण होऊन त्यांच्यात नकारात्मक विचार वाढण्याची शक्यता असते, असे मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितले.
ही घटना गंभीर असून शाळेने याची दखल घेतली आहे. पालकांची तक्रार आल्यानंतर तातडीने शिक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे. याबाबत शिक्षिकेचे मतही विचारात घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल, असे शाळेचे मुख्याध्यापक गुरुराज यांनी सांगितले.





























































