
>>अभिषेक भटपल्लीवार
चंद्रपूर जिल्ह्याला तेलंगणाची सीमा लागू आहे. या दोन्ही राज्यात ‘रोटी आणि बेटी’ चे संबंध आहेत. तेलंगणात सरकारच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविल्या जातात. मात्र कुटुंब कल्याण नियोजनासाठी तेलंगणातील कुटुंबांचे महाराष्ट्रातील आरोग्य सेवेवर भक्कम विश्वास आहे. नसबंदी शस्त्रक्रियेसाठी तेलंगणातील कुटुंब सीमोल्लंघन करून लगतच्या महाराष्ट्रातील प्राथमिक आरोग्य केंद्र गाठतात.
जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेलं गोंडपिपरी तालुक्यातील सर्वात मोठ आरोग्य केंद्र धाबा येथे नसबंदी शस्त्रक्रियेसाठी तेलंगणातील कुटुंबं मोठ्या प्रमाणात येतात. सध्या धाबा प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण नियोजन कार्यक्रम सुरू आहे. यात जवळपास 25 ते 30 तेलंगणातील कुटुंबानी शस्त्रक्रिया केली आहे.
राज्यात राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमाची अंमलबजावणी राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, स्त्री रुग्णालये, सामान्य रुग्णालये, महानगरपालिका रुग्णालये आणि नामांकित खासगी आरोग्य संस्था यांचे मार्फत केली जाते. या सर्व केंद्रामध्ये गर्भनिरोधक गोळया व निरोध वाटपाच्या सुविधा उपलब्ध आहेत. या केंद्राकडून तांबी बसविण्याच्या सुविधाही पुरविल्या जातात.
उपकेंद्र वगळता बहुतांश इतर सर्व ठिकाणी शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातील सधन आणि मध्यमवर्गीय कुटुंबे उपचारासाठी सरकारी रुग्णालयाकडे पाठ फिरवतात. खासगी रुग्णालयात उपचारासाठी लाखो रुपये खर्च करतात. असे असताना महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयात सुविधा उत्तम आहेत, यासाठी परराज्यातील कुटुंबे राज्याची सीमा ओलांडून उपचारासाठी महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालय गाठतात. ही महाराष्ट्रातील आरोग्य सेवेसाठी भूषणावह बाब आहे.



























































